एन्.सी.एम्.सी. कार्डच्या विक्रीत अधिक दर आकारणार्‍यांचे परवाने रहित ! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

परिवहनमंत्र्यांचा आदेश

मुंबई – राज्य परिवहन मंडळांच्या (एस्.टी.च्या) ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एन्.सी.एम्.सी.) विक्रीमध्ये मनमानी करणार्‍या ‘एजंट’चे परवानेच थेट रहित करण्याचा आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. ‘प्रवाशांची लूट करणार्‍यांची गय केली जाणार नाही’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

तिकिटामध्ये सवलतीच्या प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एन्.सी.एम्.सी.) दिले जाते. सवलतीच्या प्रवासासाठी पारदर्शक आणि डिजिटल प्रणाली आणण्याच्या उद्देशाने या कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे कार्ड देण्याची देशभरात ३ सहस्रांहून अधिक केंद्रे आहेत. नवीन कार्डासाठी १९९ रुपये आणि जुन्या स्मार्ट कार्डधारकांसाठी १४९ रुपये असा दर आहे; मात्र काही केंद्रांमध्ये अधिक दर आकारला जात असल्याच्या तक्रारी परिवहनमंत्री सरनाईक यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांनी वरील आदेश दिला.