निःस्वार्थ सेवेतून संस्थेची प्रगती; प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव !

शेवगाव (जिल्हा नगर), ३ मे – अहंकारविरहित आणि निःस्वार्थ भावनेने कोणत्याही संस्थेचे कार्य केले, तर त्या संस्थेची प्रगती निश्चित होते. योगतज्ञ प.पू. वैशंपायन यांच्या सान्निध्यात चालू असलेले ‘दत्त मंदिर संस्था आणि गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, कला अन् क्रीडा संस्थेचे कार्य तालुक्यासाठी प्रेरणादायी आहे’, असे विधान ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी केले. शेवगाव येथे गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित ‘आध्यात्मिक अन् सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्या’त ते बोलत होते. या वेळी ‘जगदंबा ट्रस्ट, देऊळगाव राजा’चे संस्थापक प.पू. प्रा. मुकुंदनाथ आंधळे महाराज यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादाच्या लहरी आजही या परिसरात जाणवतात. समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्यांचा गौरव करून संस्था त्यांना नवे बळ देते.’’
गेल्या २६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी समाजातील उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना गौरवण्यात येते. यंदा १६ व्या वर्षी आयोजित या पुरस्कार सोहळ्यात ‘आध्यात्मिक कार्य गौरव’ पुरस्कार अकोल्याच्या श्रीनाथ शक्तिपीठाचे प.पू. नरेंद्रनाथ महाराज यांना प्रदान करण्यात आला. ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कार निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती तथा शेवगावचे भूमीपुत्र संतोष काकडे, अमरावती येथील मतीनजी भोसले आणि सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे (कोकण विभाग, ठाणे) यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन भक्तनिवासा’चे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंद रोकडे आणि अन्य कार्यकर्ते यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी प्राचार्य दिलीप फलके यांनी केले. आभार प्रदर्शन निवृत्ती गोरे यांनी मानले.
या प्रसंगी नगराध्यक्षा मायाताई मुंढे, अरुण मुंढे, पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, डॉ. महेंद्र गौशाल, रवींद्र पुसाळकर, उपअभियंता प्रल्हाद पाठक, संजय फडके, आरती पवार, डॉ. संजय लाड, डॉ. बाळासाहेब मुरदारे यांच्यासह बन्सी पांगरे, जनार्दन हारके, पी.बी. शिंदे, किसनराव माने, लक्ष्मण काळे, बंडू भोर, अभय पालवे, प्राचार्य कुलकर्णी, सुरेश घुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मनोगतानंतर आरती आणि महाप्रसाद यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली