स्वबोधाची आवश्यकता आणि खोटा इतिहास : युवा पिढीला पुन्हा महान राष्ट्रकार्यासाठी जागृत करण्याची वेळ !

भारतवर्षाला प्राचीन आणि दैदीप्यमान असा इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग यांसारख्या अनेक ज्ञात-अज्ञात राष्ट्रपुरुषांच्या बलीदानातून हे राष्ट्र उभे राहिले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा अंश आजही आपल्या रक्तात सळसळत आहे; परंतु आजच्या युवकांनी स्वतःला एक प्रश्न विचारण्याची अत्यंत आवश्यकता आहे, ‘ज्या ध्येयाने प्रेरित होऊन या राष्ट्रपुरुषांनी पारतंत्र्याच्या बेड्या झुगारल्या, त्या त्यागाची जाणीव आज आपल्याला आहे का ? त्यांच्या संघर्षातून आपण काही शिकलो का ?’ दुर्दैवाने आजची युवाशक्ती या जाज्वल्य इतिहासापासून दूर जातांना दिसत आहे.

१. काँग्रेसच्या कार्यकाळात इतिहासाची हत्या आणि छद्म ‘नॅरेटिव्ह’ (कथानक)

भारतात आज जगातील सर्वाधिक युवाशक्ती आहे; मात्र या शक्तीला भ्रमिष्ट करण्याचे षड्यंत्र गेली अनेक दशके राबवले गेले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या कार्यकाळात पाठ्यपुस्तकांमधून पद्धतशीरपणे खोटा इतिहास शिकवण्यात आला. पहिल्या ५ शिक्षणमंत्र्यांच्या कार्यकाळात आणि त्यानंतर शिक्षणव्यवस्था साम्यवाद्यांच्या हातात गेल्यामुळे इतिहासाची मोडतोड करण्यात आली. ज्या गोष्टींमधून शौर्य, पराक्रम आणि प्रेरणा निर्माण होईल, अशी सर्व प्रेरणास्थाने दुर्लक्षित ठेवून मोगलांचे उदात्तीकरण करणारी सूत्रे अभ्यासक्रमात घुसवण्यात आली. ही केवळ इतिहासाशी प्रतारणा नसून एकप्रकारे इतिहासाची हत्याच आहे.

कु. पार्थ घनवट

२. मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण आणि हिंदवी स्वराज्याला दुय्यम स्थान का ?

‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (एन्.सी.ई.आर्.टी.) आणि ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ’ (सी.बी.एस्.ई.) यांसारख्या शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांना अत्यंत नगण्य स्थान दिले गेले. याउलट अकबर, बाबर, हुमायून आणि औरंगजेब यांच्यावर पानेच्या पाने भरभरून लिखाण करत त्यांचे उदात्तीकरण करण्यात आले. परिणामी युवकांच्या मनात खालील चुकीचे विचार पेरले गेले –

अ. अकबराची खोटी महानता : अकबर किती धर्मनिरपेक्ष होता आणि त्याने कशी शांतता राखली, असे भासवले गेले. प्रत्यक्षात त्याने हिंदूंवर केलेले अत्याचार दडपले गेले.

आ. टिपू सुलतानचे गोडवे : टिपू सुलतान हा सहिष्णू असल्याचे शिकवले गेले; मात्र त्याने केलेला हिंदूंचा नरसंहार आणि धर्मांतर यांवर पडदा टाकण्यात आला.

इ. स्वराज्याचे अवमूल्यन : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य केवळ ‘तीन जिल्ह्यांचे’ होते, असा खोडसाळ प्रचार करून त्यांच्या अफाट कार्याचे महत्त्व न्यून करण्याचा प्रयत्न झाला.

ई. पानिपत आणि पराभवाचे कारण : पानिपतच्या तिसर्‍या युद्धात ‘मराठे केवळ अहंकारामुळे हरले’, असे शिकवून त्यांच्या अतुलनीय शौर्याचा अपमान करण्यात आला.

उ. क्रांतीकारकांच्या बलीदानाची चेष्टा : ‘भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या फाशीमुळे देश स्वतंत्र झाला नाही’, असे विचार मांडून त्यांच्या क्रांतीकार्याला दुय्यम ठरवण्यात आले.

अशा विषारी प्रचारामुळे आजची पिढी ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) बनली असून स्वधर्मातील श्रेष्ठ परंपरांवर शंका घेऊ लागली आहे.

३. विजिगीषु वृत्तीचा अभाव आणि सत्याचा प्रकाश

खरा इतिहास हा आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे आद्यक्रांतीकारकच होते. ज्या काळात ५ धर्मांध पातशाह्या देशावर राज्य करत होत्या, त्या काळात त्यांच्या उरात धडकी भरवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. पानिपतच्या पराभवानंतरही मराठ्यांनी गरुड पक्ष्याप्रमाणे झेप घेत पुन्हा दोनदा देहली जिंकली आणि पुढील १८ वर्षे देहलीवर भगवा झेंडा दिमाखात फडकत राहिला. हे सत्य जर युवकांपर्यंत पोचले, तरच त्यांच्यातील सुप्त राष्ट्राभिमान पुन्हा जागृत होईल.

४. इस्रायल आणि चीन यांच्याकडून बोध घेण्याची आवश्यकता

आज इस्रायल आणि चीन येथील युवकांमध्ये त्यांच्या देशाविषयी प्रचंड स्वाभिमान दिसून येतो. याचे मुख्य कारण, म्हणजे त्यांची शिक्षणपद्धत. इस्रायलमध्ये ‘होलोकॉस्ट’ आणि ज्यू लोकांचा संघर्ष यांविषयी खोलवर शिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना राष्ट्राची किंमत कळते. तिथे ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार मुलांच्या मनावर लहानपणापासून बिंबवला जातो. भारतानेही आता हाच आदर्श समोर ठेवला पाहिजे. आपल्या देशाला मिळालेली वेद, उपनिषदे, साधू-महंत आणि ऋषिमुनी यांची शिकवण पुन्हा एकदा शिक्षणव्यवस्थेत आणणे अनिवार्य आहे.

५. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प आणि युवा पिढीचे कर्तव्य

इंग्रजांनी जातांना ज्याप्रमाणे हिंदूंची स्मारके आणि गड-किल्ले उद्ध्वस्त करून हिंदूंच्या प्रेरणास्थानांवर आघात केले, तेच कार्य स्वातंत्र्यानंतरच्या शासनकर्त्यांनी विचारांच्या पातळीवर केले. आता ही स्थिती पालटण्याची वेळ आली आहे. खर्‍या इतिहासाचे संवर्धन करणे, हेच येणार्‍या पिढीला दिलेली सर्वांत मोठी भेट ठरेल.

चला, आपण सर्वजण इतिहासाच्या या मोडतोडीला प्रत्युत्तर देऊया. आपल्या महान राष्ट्रपुरुषांच्या शौर्याची स्फूर्ती घेऊया आणि पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची शपथ घेऊन राष्ट्रकार्यासाठी कटिबद्ध होऊया. जेव्हा आपल्या युवा पिढीमध्ये हा स्वाभिमान निर्माण होईल, तेव्हाच हे राष्ट्र खर्‍या अर्थाने ‘रामराज्या’च्या दिशेने मार्गक्रमण करील.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– श्री. पार्थ घनवट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२६)