लावणीच्या सध्याच्या अश्लील स्वरूपावर निर्बंध घालण्यासाठी परिनिरीक्षण मंडळ स्थापन करावे ! – राष्ट्रवादी काँग्रेस

लावणी (प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेली पारंपरिक लावणीच्या नावाखाली वाढत्या अश्लील सादरीकरणांमुळे या कलेची प्रतिमा मलिन होत आहे. अलीकडच्या काळात ‘डीजे डान्स’ (मोठ्या आवाजातील ध्वनीयंत्रणा लावून केलेला नाच) आणि ‘स्टेज शो’च्या (मंचावरील कार्यक्रम) नावाखाली सादर होणार्‍या कार्यक्रमांमध्ये अश्लीलता वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक लावणीचा गाभा धोक्यात आला आहे. अयोग्य सादरीकरणांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र सेन्सॉर (परिनिरीक्षण) मंडळ स्थापन करावे. या मंडळाच्या माध्यमातून लावणी सादरीकरणांवर नियंत्रण ठेवून, पारंपरिक स्वरूप जपावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.

लावणीतील अश्लील हालचाली आणि अयोग्य वेशभूषेवर बंदी घालणे, मंचावरील सादरीकरणांसाठी कडक नियमावली लागू करणे, जत्रा, वाढदिवस, बैलपोळा यांसारख्या कार्यक्रमांमध्ये ट्रॉली किंवा स्टेजवर होणार्‍या नृत्यप्रकारांवर निर्बंध आणणे, लावणीचे जतन आणि संवर्धन यांसाठी प्रशिक्षण शिबिरे अन् शासकीय योजना राबवणे याविषयी या पत्रात मागण्या करण्यात आल्या आहेत.

लावणीच्या मूळ स्वरूपाचे जतन करतांनाच पालटत्या काळाशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे काहींचे मत आहे.