लोकलमध्ये फेरीवाले नकोतच ! – उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

फेरीवाल्यांना अधिकृत परवाने देण्याच्या निर्णयाला विरोध

ए आय निर्मित चित्र

बदलापूर – मुंबई उपनगरीय लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृत परवाने देण्याच्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या निर्णयाला ‘उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघा’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे संमत केलेली निविदा तात्काळ रहित करण्याची मागणी महासंघाने केली आहे.

महासंघाचे माजी अध्यक्ष आणि मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार याविषयीचे निवेदन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक, तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे. लोकलगाड्यांमध्ये १०० अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी भिवंडीतील एका ठेकेदार आस्थापनाला दीड कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे.

महासंघाच्या दृष्टीने लोकलच्या प्रवासातील गर्दी पहाता फेरीवाल्यांना प्रवेश देणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यांच्यापेक्षा प्रवाशांना जागा देण्याकडे लक्ष द्यायला हवे.