गोव्यात स्वतंत्र ‘आयुष’ खात्यासाठी मंत्रीमंडळाची संमती

आयुर्वेद आणि योग यांना मिळणार चालना

पणजी, १९ एप्रिल (वार्ता.) – आयुर्वेद, योग, निसर्गाेपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी या भारतीय उपचार पद्धतींच्या विकासासाठी राज्य सरकारने ‘आयुष’साठी स्वतंत्र खाते स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संमती दिली आहे.

सध्या आयुष विभाग आरोग्य सेवा संचालनालयाच्या उपसंचालकांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. नवीन निर्णयामुळे ‘आयुष’ हे स्वतंत्र संचालनालय म्हणून कार्य करणार आहे आणि यासाठी स्वतंत्र संचालकही नेमला जाणार आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१४ मध्ये स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केले आणि या अंतर्गत विविध योजना राज्यांसाठी चालू केल्या. सध्या गोव्यातील प्राथमिक, सामुदायिक आणि शहरी आरोग्य केंद्रे, तसेच उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालये येथे आयुर्वेदिक अन् होमिओपॅथिक चिकित्सालये चालू आहेत, तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी बाह्य रुग्ण विभागाच्या माध्यमातून रुग्णांना औषधे, उपचारपद्धती आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन करत आहेत. राज्यात सध्या ८ ‘आयुष वेलनेस केंद्रे’ कार्यरत आहेत. गोवा सरकारच्या नवीन निर्णयामुळे आयुर्वेद, योग, होमिओपॅथी आदींना स्वतंत्र प्रशासकीय बळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रांच्या योजनांचा थेट लाभ मिळणे, स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करणे, राज्यातील आयुष सुविधा अधिक सक्षम करणे आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा प्रचार आणि विस्तार करणे नवीन निर्णयामुळे सुलभ होणार आहे.