पक्षी उष्माघातामुळे कोसळतात, तिथे माणसांची काय अवस्था ? – मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न

उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू !

मुंबई – जिथे उष्माघातामुळे झाडावरील पक्षी भूमीवर कोसळत आहेत, तिथे माणसांची काय अवस्था होत असेल ? अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. कुपोषण, भीषण पाणीटंचाई आणि उष्माघात या त्रिसूत्री संकटामुळे मेळघाटातील आदिवासींचा जीव धोक्यात आला असून न्यायालयाने यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यंदा उष्माघातामुळे ७९ जणांना रुग्णालयात भरती करावे लागले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी भयावह आहे.

१. मेळघाटासह आदिवासी भागातील मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू होतो. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. राजेंद्र बर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांनी विविध जनहित याचिका प्रविष्ट केल्या.

२. वर्ष १९९३ पासून न्यायालय निर्देश देत असूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. मेळघाट, धारणी आणि चिखलदरा परिसरात स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ आणि आहारतज्ञ ही पदे रिक्त आहेत.

३. न्यायालयीन खंडपिठाने विभागवार सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. २९ एप्रिल या दिवशी धारणी आणि मेळघाटातील समस्यांवर स्वतंत्र चर्चा होणार आहे.

४. राज्य सरकार या विषयाकडे गांभीर्याने पहात नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण यांना पुढील सुनावणीत प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सरकारी अधिकार्‍यांची आलटून-पालटून उपस्थिती यापुढे खपवून घेतली जाणार नाही’, असे न्यायमूर्तींनी सुनावले. (हे सांगण्याची वेळ न्यायालयावर का येते ? – संपादक)