राज्यातील आदिवासी पाड्यांसाठी ६ रुग्णवाहिका !

मुंबई – भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर आणि ‘स्व. लीलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांसाठी ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण १६ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी झाले.

‘देवाभाऊ रुग्णसेवा’ या नावाने या रुग्णवाहिका सेवा करणार आहेत. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आदिवासी भागातील दुर्गम, डोंगराळ गावांमध्ये  रुग्णवाहिकेची सेवा मिळू शकणार आहे. आदिवासी बांधवांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळू शकतात.

नंदुरबार येथील ‘शांताबाई ट्रस्ट’, चंद्रपूर-गडचिरोली येथील ‘द रिसर्च ऑर्गनायझेशन’, पालघर येथील ‘श्रमजीवी संघटना’, रायगड ‘जिल्ह्यातील कालकाई सामाजिक शिक्षण संथा’ अशा संस्थांना, तसेच शहापूर आणि संजय गांधी नॅशनल पार्क मधील आदिवासी पाडे यांना ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकरिता १ लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे.