राज्य परिवहन महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ आकारणी !

उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी निर्णय

 

सातारा, १४ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उन्हाळी गर्दीचा हंगाम १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत (परिवर्तनशील भाडे आकारणी) प्रवास भाड्याच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यानुसार साध्या, जलद, रात्रसेवा साधारण बसगाड्यांसाठी १० टक्के दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. प्रतिप्रवासी २ रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’ही वाढवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रक सौ. ज्योती गायकवाड यांनी दिली आहे.

ज्या प्रवाशांनी उपरोल्लेखित कालावधीसाठी आगाऊ आरक्षण केलेले असेल, त्यांच्याकडून प्रवास करतेवेळी आरक्षण तिकिटाचा जुना दर आणि नवीन तिकीट दर यांतील फरक वसूल करण्यात येणार आहे.

आधीच भाडेवाढ त्यात ‘स्वच्छता करा’चा भुर्दंड !

स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र स्वच्छता यंत्रणा कार्यान्वित असतांना केवळ समन्वयाअभावी सर्व आगारांमध्ये अस्वच्छता दिसून येते. यावर उपाय करण्याऐवजी नागरिकांकडून जाचक स्वच्छता कर आकारणी करणे, कितपत योग्य आहे ? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.