कोकण रेल्वेच्या २६३ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण होणार !

  • शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या लोकसभेतील प्रश्नावर केंद्रशासनाची माहिती

  • प्रस्तावाचे काम चालू !

मुंबई – कोकण रेल्वेच्या २६३ किलोमीटर मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ‘कोकण रेल्वे कॉर्पाेरेशन लिमिटेड’कडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) सिद्ध करण्याची प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती केंद्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेतील शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

१० फेब्रुवारी या दिवशी रवींद्र वायकर यांनी लोकसभेत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ची (‘के.आर्.सी.एल्.’ची) स्थापना कोकण रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जुलै १९९० मध्ये करण्यात आली. हा मार्ग भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्र राज्यातील रोहा ते कर्नाटक राज्यातील ठोकूरपर्यंत ७४० किलोमीटर लांबीचा आहे. सध्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये रेल्वे मंत्रालयाद्वारे केंद्रशासनाची ६६.३५ टक्के, तर महाराष्ट्र शासनाची १५.११ टक्के, तर कर्नाटक शासनाची १०.३०, तर गोवा शासनाची ४.१२ टक्के भागीदारी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे, हे वरील सर्व भागधारकांसह राज्यशासनाच्या संमतीवर अवलंबून आहे. कोकण रेल्वेच्या क्षेत्रात येणार्‍या ७४० किलोमीटर मार्गातील रोहा ते वीर, तसेच मडगाव ते माजोर्डा या भागातील जवळजवळ ५५ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. उर्वरित ६८५ किलोमीटर मार्गाच्या दुपदरीकरणासाठी भागीदारी असलेल्या राज्यशासनांकडून आर्थिक सहभागाची आवश्यकता आहे. त्यानुसार संबंधित राज्यांना कळवण्यात आले आहे, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.