माहिती अधिकाराखाली प्राप्त झालेली माहिती

पणजी, २७ मार्च (वार्ता.) – मांडवीत सध्या ‘एम्.व्ही रॉयल फ्लोटेल’ (पी.एन्.जे. – ७८०) ही कॅसिनो नौका आहे आणि आता ‘एम्.व्ही. डेल्टिन रॉयल (पी.एन्.जे. – १००८) ही त्यापेक्षा अधिक मोठी नौका आणण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित नवीन कॅसिनो नौकेची ‘गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणा’ने पहाणी करून त्यांचा अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात ‘गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणा’ने अनेक गंभीर त्रुटी आणि मूलभूत पर्यावरणीय निकष यांची नोंद केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जाद्वारे हा पहाणी अहवाल मिळवला आहे आणि याद्वारे ही माहिती उघड झाली आहे.
‘गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या अहवालातील माहिती
१. २३ जून २०२५ या दिवशी तज्ञ सदस्य डॉ. सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नवीन नौकेची प्रत्यक्ष पहाणी केली. या पहाणीच्या वेळी सध्या मांडवीत नांगरलेल्या ‘एम्.व्ही. रॉयल फ्लोटेल’ (पी.एन्.जे. – ७८०) या नौकेच्या जागी अधिक मोठे ‘एम्.व्ही. डेल्टिन रॉयल (पी.एन्.जे. – १००८) ही नौका आणण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यात आला.
२. प्रस्तावित नौका अनुमाने ११२ मीटर लांब, २८ मीटर रुंद आणि अंदाजे २६.७ मीटर उंच आहे. ही नौका ५ मजली आहे. ती नौका मांडवी नदीतील ‘समुद्रकिनारपट्टी नियमन विभाग-४’मध्ये नांगरण्याचा प्रस्ताव आहे. आधीच नदीत अनेक कॅसिनो नौका नांगरलेल्या आहेत आणि त्यात आता मोठ्या नौकेची भर पडणार असल्याने एकत्रित पर्यावरणीय परिणाम वाढण्याची शक्यता आहे.
३. अहवालात नमूद केलेली गंभीर गोष्ट म्हणजे प्रस्तावित ठिकाणच्या पाण्याचे नमुनेच घेण्यात आलेले नाहीत. अर्जदाराने ८ ठिकाणांचे पाण्याचे नमुने सादर केले असले, तरी ज्या ठिकाणी नौका उभी करायची आहे, त्या ठिकाणचे नमुने घेतलेले नाहीत. केवळ सांता मोनिका बंदराजवळील नमुने घेतले आहेत आणि संबंधित अहवाल या नमुन्यावरच आधारित आहे. ‘गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या प्रकरणी स्पष्ट केले आहे की, प्रस्तावित स्थळावर पाणी आणि गाळ यांचे सखोल नुमने घेऊनच पर्यावरणीय परिणामांचे अचूक मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
४. नौकेच्या उंचीविषयी सखोल माहिती देण्यात आलेली नाही. नौकेच्या पाचव्या स्तरापर्यंतचीच माहिती दिली असली, तरी त्यावरील ‘ओपन डेक’सह एकूण उंची स्पष्ट करण्यात आलेली नाही. ही गंभीर त्रुटी अहवालात नमूद करण्यात आली आहे.
५. या पार्श्वभूमीवर ‘अधिक सखोल विचार आणि पडताळणी करून नंतरच अंतिम निर्णय घ्यावा’, अशी शिफारस अहवालात सरकारला करण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाला तात्काळ संमती मिळण्याची शक्यता अल्प आहे, तसेच पुढील प्रक्रिया अधिक कठोर होणार असल्याचे संकेत आहेत.
मांडवी नदीत वाढत्या कॅसिनो नौकांमुळे पर्यावरणीय परिणामांविषयी आधीपासूनच चिंता व्यक्त केली जात असतांनाच ‘गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणा’चा अहवाल महत्त्वाचा मानला जात आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक