संत सावता महाराज समाधी सोहळ्याच्या पालखी नियोजन आणि व्यवस्थापन यांचा खर्च विठ्ठल मंदिर समितीने करावा !

  • आमदार योगेश टिळेकर यांची विधान परिषदेत मागणी ! 

  • मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ ! – आशिष जयस्वाल, राज्यमंत्री

श्री. योगेश टिळेकर

मुंबई, १ मार्च (वार्ता.) – संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी, अरण येथे होणार्‍या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त निघणार्‍या श्री विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन आणि व्यवस्थापन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने स्वखर्चातून करावे, अशी मागणी विधान परिषदेत आमदार श्री. योगेश टिळेकर यांनी केली. त्यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी याविषयी लक्षवेधी मांडून शासनाचे याकडे लक्ष वेधले. ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ’, असे आश्वासन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या वेळी दिले.

आमदार श्री. योगेश टिळेकर म्हणाले की, पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सोहळ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन मंदिर समितीने करावे, जेणेकरून भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील.

या वेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, सध्या अरण येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सावता महाराजांच्या अधिकृत मूळ पादुका घेऊन पालखी सोहळा नेण्याची कोणतीही पूर्वपरंपरा नाही. पंढरपूर येथून श्री कळसे परिवार आणि काशी कापडी समाजाच्या माध्यमातून श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन पालखी अरण येथे घेऊन जाण्याची अनुमाने १५० वर्षांपासूनची परंपरा आहे. पूजा, विधी, परंपरा यांत शासन हस्तक्षेप करत नाही. याविषयी तक्रार असेल ते पाहू. मूळ पादुका न्यायच्या कि नाही, याचा निर्णय न्यायालय घेईल. तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. हा विषय मंदिर समितीच्या पुढील बैठकीसमोर ठेवण्यात येणार असून त्यामध्ये कायद्यातील प्रावधान, प्रस्थापित परंपरा आणि सर्व संबंधित घटक यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.