विधान परिषदेत ऑफलाईन विषय न घेण्याच्या कारणावरून विरोधकांचा गदारोळ !

कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित !

विधान भवन (प्रतीकात्मक छायाचित्र)

मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – विधान परिषदेत २४ फेब्रुवारी या दिवशी प्रश्नोत्तराच्या घंट्यानंतर काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील २८९ नियमाअंतर्गत विषय मांडण्यास उभे राहिले; मात्र त्यांनी ‘ऑनलाईन’ प्रस्ताव सादर केला नाही, तसेच ‘१७ मिनिटे विलंबाने प्रस्ताव सादर केल्याने ‘ऑफलाईन’ विषय घेता येणार नाही’, असे कारण सांगून सभापती राम शिंदे यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. याला आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात गदारोळ केल्याने सभापतींनी १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब म्हणाले, ‘‘ऑफलाईन प्रस्ताव न घेता ऑनलाईन प्रस्ताव घेण्याचा नियम कधी पालटला ? नियम समितीत मी असतांना समितीची एकही बैठक झालेली नाही. नियमाप्रमाणेआमदारांना १ घंटा आधी ऑफलाईन विषय घेता येतो. त्यामुळे याला माझी हरकत आहे.’’

विधीमंडळ गटनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, अनिल परब विनाकारण विरोध करत आहेत. नियम समितीमध्ये त्यांनी यावर बोलावे. लक्षवेधी महत्त्वाच्या असल्याने त्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मुंबईचा विकास विरोधकांना नको आहे. त्यांना मुंबईचे काही पडलेले नाही. विरोधकांना काही करायचे नाही. या वेळी विरोधकांनी संतप्त होऊन सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा दिल्या. त्यामुळे १५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित करावे लागले.