धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ‘बलीदान मासा’ला प्रारंभ !

श्रीक्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रूक येथे प्रतिदिन श्रद्धांजली सभा !

कोरेगाव-भीमा (पुणे) – औरंगजेबाने श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथील त्रिवेणी संगमावर धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर प्रतिदिन क्रूर आक्रमण केले. अनुमाने ४० दिवस संभाजी महाराज औरंगजेबाची क्रूरता आणि निदर्यता यांना धैर्याने अन् शौर्याने सामोरे गेले. त्यांना अभिवादन म्हणून प्रतिवर्षी संभाजी महाराज यांचा त्याग आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण म्हणून ‘बलीदान मास’ पाळतात. या मासाला १८ फेब्रुवारी या दिवसापासून प्रारंभ झाला असून तो १८ मार्चपर्यंत पाळला जाणार आहे.

या बलीदान मासात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या सर्वोच्च बलीदानाचे स्मरण करण्यासाठी श्रीक्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रूक येथे प्रतिदिन सायंकाळी शंभूराजेंच्या समाधीस्थळी श्रद्धांजली सभा आयोजित केली जाते. समाधीस्थळाला प्रतिदिन आकर्षक फुलांनी सजवले जाते. रक्तदान शिबिर आणि सामूहिक मुंडण कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. या महिन्यात धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर निस्सिम प्रेम करणारे हिंदू समाधीस्थळी येऊन नतमस्तक होऊन श्रद्धांजली वहातात.

संपादकीय भूमिका

छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान मास’, म्हणजे हिंदु राजांचा अभ्यास करून धर्माचरण करण्याची संधी !