संगमनेर (अहिल्यानगर) शहरातील १४ पशूवधगृहे भुईसपाट !

  • १०० पोलिसांचा बंदोबस्त 

  • २ जेसीबी यंत्रे आणि ४ ट्रॅक्टर यांचे साहाय्य

पशूवधगृह पाडली जात असतांनाचे दृश्य

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील विविध भागांत चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहांवर १६ फेब्रुवारी या दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. २ जे.सी.बी. यंत्रे आणि ४ ट्रॅक्टर यांच्या साहाय्याने १०० पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये १४ पशूवधगृहे पाडण्यात आली. केवळ पत्र्याचे शेड (तात्पुरता निवारा) नव्हे, तर संबंधित बांधकामातील पाया जे.सी.बी.च्या साहाय्याने खोदून काढण्यात आला. जमजम वसाहत, भारतनगर, मदिनानगर आदी भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

शहरात गोमांसाची छुप्या पद्धतीने वाहतूक आणि विक्री करण्यासाठी मोठ्या गाड्यांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी कारवाई करत सहस्रो किलो गोमांस आणि गोवंशीय जप्त केले होते, तरीही छुप्या पद्धतीने गोवंशियांची हत्या चालूच होती. यापूर्वीही नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये अनेक पशूवधगृहे पाडली, तरीही पुन्हा ती उभी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही धडक कारवाई केली.

शिवसेनेचे आमदार अमोल खताळ म्हणाले, ‘‘शहरातील अनधिकृत पशूवधगृहे तातडीने पाडण्यात यावीत, अशा सूचना प्रशासनाला केल्या होत्या. पशूवधगृहे पुन्हा चालू होऊ नयेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.’’

मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी म्हणाले, ‘‘पशूवधगृहे पाडण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे आमदार महेश लांडगे, शिवसेनेचे आमदार अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. पाडलेली पशूवधगृहे पुन्हा चालू होऊ नयेत, यासाठी नगरपालिका आणि प्रशासन यांनी सातत्याने लक्ष ठेवावे.’’

संपादकीय भूमिका

पोलीस आणि प्रशासन यांनी अशाच प्रकारे राज्यातील सर्वच पशूवधगृहांवर कारवाई करावी, असे नागरिकांना वाटते !