पहिल्याच जोरदार पावसात ठाणे जिल्हा वेठीस; सखल भाग जलमय, महामार्गांवर वाहतूककोंडी

ठाणे, १ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात ३० जूनच्या रात्रीपासून पडणार्‍या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागांत पाणी साचले, तर मुंबई-नाशिक महामार्गासह प्रमुख मार्गांवर भीषण वाहतूककोंडी झाली. बर्‍याच ठिकाणी झाडे पडली. पहिल्याच पावसात नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीच्या दाव्यांचा फज्जा उडाला. रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.

ठाणे बाजारपेठ, वंदना सिनेमा, अल्मेडा रोड, गोखले रोड, कापूरबावडी आदी सखल भागांत पाणी साचले, तर अनेक ठिकाणी गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना घाणीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. बर्‍याच जणांची वाहने, रिक्शा पाण्यात बंद पडत होत्या. शिळफाटा परिसरातील रशीद कंपाऊंडमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने दुकाने आणि वाहने यांची हानी झाली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील काही परिसरात पाणी तुंबले. उंबर्डे येथे एका विद्यालयाच्या आवारात पाणी शिरले. काही शाळांची पटांगणे पाण्याने भरली होती. विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत जावे लागले. नेतिवली टेकडी आणि पत्रीपूल परिसरातील डोंगराच्या कडेला रहाणार्‍या नागरिकांना महानगरपालिकेने सतर्कतेची चेतावणी दिली आहे. पहिल्याच पावसात नालेसफाई, गटारांची स्वच्छता या कामांचा बोजवारा उडाला.

भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर जलमय झाले होते. मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, एम्.आय.डी.सी.-महापे रोड, घोडबंदर परिसरात खड्डे आणि साचलेले पाणी यांमुळे वाहतूककोंडी झाली.

पुढील ५ दिवस मुंबई, कोकण, विदर्भ येथे पाऊस पडणार !

बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील ५ दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र येथे जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात, तसेच चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये औंढा नागनाथ मोठा पाऊस झाला. परभणी मार्गावरून मोठ्या पाणी वहात आहे.