छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड आणि दुर्ग यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र स्थापन होणार !

मुंबई – सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग हे दुर्ग आणि राजकोट अन् सर्जेकोट हे गड यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापिठाच्या अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिली.

हे अध्यासन केंद्र ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट हे दुर्ग अन् गड यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण अशा बहुआयामी उपक्रमांसाठी कार्य करणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागातील ऐतिहासिक पुराव्यांचा सखोल अभ्यास होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि दूरदृष्टी यांचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन हातभार लावेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता शेलार यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग दुर्गाला १२ एप्रिल २०२५ या दिवशी ३५८ वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे आणि अन्य पदाधिकारी यांनी मालवणमधील या विषयाच्या तज्ञांना घेऊन याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.