जत्रोत्सवाच्या चोख नियोजनामुळे भक्तांना देवीचे दर्शन झाले सुलभ

मालवण – तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या ९ फेब्रुवारी या दिवशी प्रारंभ झालेल्या जत्रोत्सवाची १० फेब्रुवारी या दिवशी सांगता झाली. गेले २ दिवस अलोट गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. २ दिवसांत आंगणेवाडीत सुमारे ८ लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. जत्रोत्सवाची सांगता झाली, तरी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतच होते.
९ फेब्रुवारी या दिवशी पहाटे प्रारंभ झालेल्या या जत्रोत्सवात देवीचा जयजयकार करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री ९.५० वाजता महाप्रसादाची ताटे लावण्यासाठी (महाप्रसाद दाखवण्यासाठी) देवीचे दर्शन बंद करण्यात आले होते. प्रथम मानकर्यांची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सुवासिनींनी डोक्यावरून आणली. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या घरात बनवलेली महाप्रसादाची ताटे लावण्याचा कार्यक्रम पहाण्यासाठी देवीच्या प्रांगणात भक्तांनी गर्दी केली होती. त्यानंतर रात्री १ वाजता देवीचे दर्शन पुन्हा चालू करण्यात आले. महाप्रसादाचा सोहळा पहाण्यासाठी मध्यरात्रीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कुटुंबियांसमवेत श्री भराडीदेवीचे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी १० फेब्रुवारीला श्री भराडीदेवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरल्या. जत्रोत्सव यशस्वी केल्याविषयी आंगणे कुटुंबियांनी पोलीस, प्रशासनासह सर्वांचे आभार मानले.
एकूण ९ रांगाद्वारे दर्शन व्यवस्था आंगणे कुटुंबियांच्या वतीने केल्याने, तसेच योग्य नियोजनामुळे भाविकांना अल्प वेळेत देवीचे दर्शन मिळत होते. कुठलीही दर्शन रांग खोळंबलेली दिसून येत नव्हती. परिसरात ४८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्यांच्या साहाय्याने गर्दीचे नियोजन करण्यात येत होते. पंढरपूर येथील ‘रेस्क्यू टीम’च्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून दायित्व पार पाडले. जत्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पोलीस आणि प्रशासन यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगण यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !