ध्वनीप्रदूषणावरून हणजुणे येथील २ नाईट क्लबांना टाळे 

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

पणजी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यास आरंभ केला आहे. मंडळाने हणजुणे येथील प्रसिद्ध नाईट क्लब ‘हिल टॉप बार अँड रेस्टॉरंट’ आणि ‘सलुद किचन’ यांची ‘व्यवसाय चालू ठेवण्याची संमती’ (कन्सेंट टू ऑपरेट) मागे घेतली आहे. हा आदेश तात्काळ आणि २ महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. मंडळाने पर्यावरण (संरक्षण) कायदा – १९८६’ चे कलम ५ अंतर्गत ही कारवाई केली आहे. मंडळाने पर्यावरणीय हानीभरपाई म्हणून ‘सलुद’ आणि ‘हिल टॉप’ यांच्या व्यवस्थापनाला अनुक्रमे २ लक्ष रुपये आणि १ लक्ष ४० सहस्र रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत. ध्वनीप्रदूषण करणे आणि ‘ऑनलाईन ध्वनीप्रदूषण देखरेख प्रणाली’च्या माध्यमातून नियमितपणे प्रत्यक्ष ध्वनीसंबंधी माहिती मंडळाला न पुरवणे (रियल टाईम नॉईझ डेटा) या कारणांस्तव ही कारवाई करण्यात आली आहे.

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित दोन्ही नाईट क्लबांमध्ये १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘ऑनलाईन ध्वनीप्रदूषण देखरेख प्रणाली’च्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण झाल्याचे निदर्शनास आले, तसेच ‘ऑनलाईन ध्वनीप्रदूषण देखरेख प्रणाली’च्या माध्यमातून पुढे अनेक दिवस ध्वनीप्रदूषणासंबंधी माहिती पुरवण्यात आली नाही. यामुळे दोन्ही व्यवस्थापनांना मंडळाने २१ जानेवारी २०२६ या दिवशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. यावर ‘हिल टॉप’च्या व्यवस्थापनाने मंडळाच्या ‘कारणे दाखवा’ नोटीसीला उत्तर पाठवले; मात्र मंडळाला हे उत्तर असमाधानकारक वाटले. मंडळाच्या मते ‘हिल टॉप’ने ध्वनीप्रदूषण केलेले आहे, तर ‘सलुद किचन’च्या व्यवस्थापनाने ‘कारणे दाखवा’ नोटीसीला उत्तरच दिले नाही. मंडळाने दोन्ही नाईट क्लबांच्या व्यवस्थापनाला नाईट क्लबमध्ये योग्य ध्वनीरोधक संरक्षक कवच (ॲकॉस्टीक एन्क्लोजर) आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी दुहेरी दरवाजा प्रणाली कार्यरत करणे, या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले आहेत. क्लब पुन्हा चालू करण्यापूर्वी, तसेच वरील आवश्यक सुधारणा करतांना वीज खाते, अग्नीशमन दल, स्थानिक पंचायत आणि तत्सम संस्था यांचे मार्गदर्शन अन् अनुमती घेणे नाईट क्लबच्या व्यवस्थापनाला बंधनकारक आहे. आदेशाचे पालन न केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करण्याची चेतावणी मंडळाने दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे अग्नीशमनदलाविषयी कडक धोरण

 

डॉ. प्रमोद सावंत

पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अग्नीशमन दलासमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत बर्च बाय रोमिओ लेन क्लबला ‘ना हरकत’ दाखला दिल्याच्या प्रकरणी अग्नीशमनदलाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिवही उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली नाईट क्लबसाठी ‘मार्गदर्शक तत्त्वे’ (स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसीजर) सिद्ध करून ती लागू करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच हडफडे आग दुर्घटनेवरून बर्च बाय रोमिओ लेन क्लबला ‘ना हरकत’ दाखला देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.