लुथरा बंधू, रोशन रेडकर आणि रघुवीर बागकर यांच्या घरांवर ‘ईडी’ आणि आयकर यांची धाड

  • हडफडे (गोवा) येथील आगीची दुर्घटना

  • देहली आणि गोवा येथे एकूण ९ ठिकाणी धाडी

पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमधील आग दुर्घटनेतील प्रमुख संशयित आणि क्लबचे मालक गौरव अन् सौरभ लुथरा, सहमालक अजय गुप्ता, क्लबला कथित अनधिकृत परवाना दिल्याचा आरोप असलेले पंचायतीचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांच्यासह या प्रकरणातील अनेक संशयितांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालय (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट – ईडी) अन् आयकर विभाग यांनी २३ जानेवारीच्या पहाटेपासून एकाच वेळी धाडी घातल्या. गोव्यासह देहली आणि गुरुग्राम येथील एकूण ९ ठिकाणी संयुक्त कारवाई केली जात आहे.

क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांच्या मालकीचे देहली येथील निवासस्थान अन् त्यांची इतर आस्थापने यांच्यावरही एकाच वेळी धाडी घालण्यात आल्या. गुरुग्राम येथील ‘कॉट्रम लेन्स’ (किंग्सवे कँप) आणि ‘तत्वम व्हिला’ येथे धाडी घालण्यात आल्या आहेत. ‘आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईद्वारे क्लबचे अवैध कामकाज आणि आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) यांची शक्यता पडताळली जात आहे.

हडफडे येथील नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ या दिवशी झालेल्या आग दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. यानंतर आता ‘ईडी’ आणि आयकर खाते यांची कारवाई चालू झाली आहे.

हडफडे, मयडे आणि पर्रा येथेही धाडसत्र

हडफडे येथील आग दुर्घटनेच्या प्रकरणी पोलिसांच्या कह्यात असलेले हडफडे पंचायतीचे माजी सरपंच रोशन रेडकर यांच्या निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्तात धाड घातली. रोशन रेडकर हे २२ जानेवारी या दिवशी न्यायालयासमोर शरण आल्यानंतर त्याला पोलिसांनी कह्यात घेतले. या प्रकरणी अटकेत असलेले पंचायतीचे बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांच्या मयडे येथील मूळ घरावर आणि पर्रा येथील आणखी एक घरावर धाड घालण्यात आली.

सुरेंद्र कुमार खोसला यांचे घर आणि कार्यालय यांच्यावरही धाड

यासह ‘बर्च बाय रोमिया लेन’ हा नाईट क्लब ज्या खाजन भूमीत उभारण्यात आला आहे, त्या भूमीच्या अनधिकृत रूपांतरणातून उद्भवलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुरेंद्र कुमार खोसला याचे घर आणि कार्यालय येथे ‘ईडी’ने धाड घातली.