यशवंत बँकेमध्ये संगनमताने ११२ कोटींहून अधिक रकमेचा अपहार !

सातारा, १३ ऑक्टोबर (वार्ता.) –  फलटण येथील यशवंत बँकेच्या वर्ष २०१८ ते वर्ष २०२४ या लेखापरीक्षण कालावधीमध्ये कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. बँकेमध्ये ११२ कोटी १० लाख ५७ सहस्त्र ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याविषयी पोलिसात तक्रार दिली आहे.

मंदार देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

१. ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीमध्ये यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी आणि संचालक यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बँकेची आर्थिक हानी केली आहे.

२. हा अपहार संगनमताने करण्यात आला असून १९५ बनावट कर्ज प्रकरणे करून यासाठी खोटी आणि बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यात आली आहेत.

३. कोणतेही तारण न घेता हेतूपुरस्सर कर्जवितरण करण्यात आले, जुनी थकित खाती बंद दाखवून नवीन खाती उघडण्यात आली आहेत. त्याद्वारे निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून तृतीय पक्षांकडे निधी वळवला आहे.

४. कागदपत्रांत फेरफार आणि खोट्या नोंदी सिद्ध करून बँकेच्या निधीचा चुकीचा विनियोग करून अपहार केला आहे.

५. चरेगावकर यांच्यासह ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक आणि चरेगावकर यांचे नातेवाईक यांचा यामध्ये समावेश आहे. संबंधितांनी त्यांचे कर्तव्य पार न पडता, पदाचा अपलाभ घेत बँकेच्या ठेवीदार आणि सभासद यांच्या हितसंबंधांना बाधा निर्माण केली आहे.