Modi  Ghana Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा दुसरा सर्वाेच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान !

पंतप्रधान मोदी व जॉन द्रमानी महामा

ॲक्रा (घाना) – पंतप्रधान मोदी हे सध्या पश्चिमी आफ्रिकी देश असलेल्या घानाच्या दौर्‍यावर आहेत. यामध्ये त्यांना घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांनी घानाचा दुसरा सर्वाेच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. ‘दी ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ असे या पुरस्काराचे नाव आहे. पंतप्रधानांचे प्रशासकीय, तसेच जागतिक नेतृत्व यांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आल्याचे घाना सरकारने सांगितले.


पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी घानाच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानतो. उभय देशांच्या तरुणाईच्या भवितव्याला, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्यतेला आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. भारत नेहमीच घानासमवेत उभा राहील आणि एक मित्र अन् विकासातील भागीदार म्हणून नेहमीच घानाला साहाय्य करत राहील, असे आश्वासनही मोदी यांनी या वेळी दिले.

वास्तविक वर्ष २००८ पर्यंत हा घानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार होता; मात्र नंतर ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द स्टार अँड इगल्स ऑफ घाना’ हा सर्वोच्च पुरस्कार घोषित झाला.