अमरावती : वाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देणार ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री

श्री. गुलाबराव पाटील

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली, तसेच अमरावती तालुक्यामधील १०५ गावांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यवाहीत काही अडचणींमुळे विलंब झाला आहे. या योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याविषयी सदस्य राजेश वानखेडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

मंत्री पाटील म्हणाले की, या वाढीव पाणीपुरवठा योजनेस वर्ष २०२१ मध्ये तांत्रिक मान्यता, तर वर्ष २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कामे संथ गतीने झाल्याने कंत्राटदारास दंड आकारण्यात आला आहे. या योजनेतून सध्या ८१ गावांना दरडोई ४० लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे.