देहली येथून गोव्‍यात खोट्या कागदपत्रांच्‍या आधारे गोमांसाची वाहतूक

कोकण रेल्‍वे पोलिसांनी गोमांसाची अवैध वाहतूक उघडकीस आणली

मडगाव, ९ मार्च (वार्ता.) – देहली येथून गोव्‍यात खोट्या कागदपत्रांच्‍या आधारे गोमांसाची वाहतूक केली जात होती. कोकण रेल्‍वे पोलिसांनी १ लक्ष ५४ सहस्र रुपये किमतीचे ५१४ किलो ५०० ग्रॅम गोमांस कह्यात घेतले आहे. पोलिसांनी दवर्ली, मडगाव येथील संशयित फयाझ अहमद केनगेवार याला या प्रकरणी कह्यात घेतले आहे.

देहली येथील हजरत निजामुद्दिन रेल्‍वेस्‍थानकातून मडगाव रेल्‍वेस्‍थानकात पार्सलद्वारे गोमांस पाठवण्‍यात आले. मडगाव रेल्‍वेस्‍थानकावर पार्सल सेवेद्वारे आलेल्‍या एका पार्सलसाठी दिलेली कागदपत्रे आणि माल यांच्‍यामध्‍ये तफावत आढळून आल्‍याने हा प्रकार उघडकीस आला आहे. देहली येथील हजरत निजामुद्दिन रेल्‍वेस्‍थानकावर पार्सल सेवेद्वारे माल देतांना चुकीचे प्रमाणपत्र आणि सक्षम अधिकार्‍यांकडून तपासणी केल्‍याची कोणतीही कादगपत्रे देण्‍यात आली नव्‍हती. गोव्‍यात विक्रीसाठी हा माल आणण्‍यात आला होता. गोमांसाच्‍या वाहतुकीसाठी साठवणुकीसंबंधी योग्‍य काळजीही घेण्‍यात आली नव्‍हती. हा प्रकार उघडकीस आल्‍यानंतर रेल्‍वे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्‍या मार्गदर्शनानुसार कोकणे रेल्‍वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर अन् त्‍यांचे इतर सहकारी यांनी ही कारवाई केली. अन्‍वेषणानंतर संशयित फयाझ अहमद केनगेवार याच्‍या विरोधात गोवा प्राणी संरक्षण कायदा आणि रेल्‍वे कायदा यांच्‍या तरतुदींचे उल्लंघन केल्‍याच्‍या प्रकरणी गुन्‍हा नोंद करून त्‍याला कह्यात घेण्‍यात आले आहे.