‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त होणार पुरस्कारांचे वितरण !

मुंबई – मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजता ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच अन्य मंत्रीही उपस्थित रहाणार आहेत.

वर्ष २०२४ चा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना घोषित करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेचा ‘श्री.पु. भागवत पुरस्कार’ पुणे येथील ज्योत्स्ना प्रकाशनाला घोषित करण्यात आला आहे. ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक’ पुरस्कार डॉ. रमेश सीताराम सूर्यवंशी यांना, तर ‘मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन’ पुरस्कार श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना घोषित करण्यात आला आहे. वर्ष २०२३ च्या पुरस्कारामध्ये ‘प्रौढ वाङ्मय’अंतर्गत काव्य प्रकारात ‘कवी केशवसूत पुरस्कार’ एकनाथ पाटील यांच्या ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकाला घोषित झाला आहे. यांसह मराठी साहित्याविषयीचे विविध पुरस्कार या वेळी दिले जाणार आहेत.