पुणे – परिवाराचा कुणी सदस्य एखाद्या खोलीत व्यवसाय करत असेल, जसे शिकवणी, ब्युटी पार्लर, अधिवक्ता कार्यालय इत्यादी तर अनिवासी (व्यावसायिक) क्रमवारीनुसार शुल्क आकारण्यात येईल, असा आरोप काही संस्थांकडून करण्यात येत होता. सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांसाठीचा वीजदर ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने अल्प करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ही याचिका घातक कशी असेल ? ‘महावितरण’च्या वीजदर प्रस्तावला विरोध करणे हे ग्राहकांसाठीच हानीकारक आहे, असे स्पष्टीकरण ‘महावितरण’ने दिले आहे.
सर्वसाधारण घरगुती ग्राहकांचा वीज वापर महिना ३०० युनिटपर्यंत असतो. अशा ग्राहकांच्या घरातील एका खोलीचा वापर व्यवसायासाठी करत असतील आणि घरांतील विजेचा वापर ३०० युनिटच्या वर गेल्यास त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे सवलत मिळणार नाही, असे महावितरणकडून स्पष्ट केले आहे. सौर ऊर्जेतून जेवढी वीज सिद्ध (तयार) केली जाते. त्यातील वापरून उरलेली वीज ‘महावितरण’ला ३ ते ४ रुपयाने विकायची आणि पुन्हा त्यांच्याकडून १५ ते १६ रुपयांना तीच वीज विकत घ्यावी लागेल, असाही आरोप करण्यात येत आहे. हा विषय घरगुती ग्राहकांशी संबंधित आहे. ज्या ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले आहेत, त्यांच्या नेट मीटरनुसार होत असलेल्या हिशोबात कोणताही पालट प्रस्तावित नाही, असेही ‘महावितरण’ने सांगितले.