सातारा, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – श्रीक्षेत्र सज्जनगड येथे गुरुप्रतिपदा म्हणजे १३ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या दासनवमी उत्सवाची सांगता २२ फेब्रुवारी या दिवशी झाली. दासनवमी हा यात्रेचा मुख्य दिवस असून लळिताच्या कीर्तनाने २३ फेब्रुवारी यादिवशी यात्रेचा समारोप झाला. गत ९ दिवसांपासून गडावर रामनामाचा गजर चालू होता. अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजन-गायन सेवा गडावर चालू होती. दासनवमीच्या दिवशी मध्यरात्री २ वाजता समाधी मंदिरात काकड आरती झाली. नंतर पहाटे ४ वाजता श्रींच्या समाधीची महापूजा झाली. सकाळी १०.३० वाजता सांप्रदायिक भिक्षा पार पडली. विशेष पूजेमध्ये समर्थांच्या समाधीवर गुलाब, चाफा, मोगरा, शेवंती, जास्वंदी आदी फुलांची आरास करण्यात आली होती. श्री समर्थ समाधीच्या वर असणार्या श्री रामपंचायतन मूर्तींनाही विशेष सजावट करण्यात आली होती. सांप्रदायिक भिक्षेमध्ये समर्थ रामदासस्वामी यांचे वंशज भूषण स्वामी, तसेच भारतभरात असणार्या समर्थ संप्रदायाच्या विविध मठांतील महंत, मठपती, मानकरी आणि सहस्रो भाविक उपस्थित होते. सकाळी १०.३० वाजता आरती आणि छबीना, तसेच मानाच्या १३ प्रदक्षिणा झाल्या. दुपारी १२ वाजता समर्थभक्त पू. सुरेशबुवा सोन्ना महाराज यांनी श्री समर्थ निर्वाण कथा सांगितली. दुपारी १२.३० वाजल्यापासून ‘श्री रामदास स्वामी संस्थान’ आणि ‘श्री समर्थ सेवा मंडळ’ यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. रात्री ९.३० वाजता समर्थभक्त राघवेंद्रबुवा रामदासी यांनी कीर्तन सेवा केली.