|
पणजी, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – कर्नाटकातून गोव्यात प्रतिदिन ३० टन मांसाची तस्करी होत असल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडून थेट गोव्याच्या मुख्य सचिवांकडे पोचली आहे. यामुळे गोव्यातील पशूसंवर्धन खाते खडबडून जागे झाले आहे. गोव्याच्या सीमांवर दक्षता राखण्याचे निर्देश खात्याने अधिकार्यांना दिले आहेत. यासंबंधीचे परिपत्रक खात्याने प्रसिद्ध केले आहे. ही तक्रार मनेका संजय गांधी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती आणि ती पुढील कार्यवाहीसाठी गोव्याकडे पाठवण्यात आली आहे.
पशूसंवर्धन खात्याने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, गोव्यात येणार्या मांसाचे सीमेवर कसून अन्वेषण करावे. हे मांस विक्रेत्यांच्या दुकानांपर्यंत कसे पोचते? त्यांची कागदपत्रे योग्य आहेत कि नाहीत ? याचे अन्वेषण करावे. काही अनधिकृत असल्यास वाहनासह मांस कह्यात घ्यावे. गोव्यात मांसाची तस्करी होणार नाही, याची पशूसंवर्धन खात्याच्या अधिकार्यांनी निश्चिती करावी. गोव्यात येणारी गुरे ही नोंदणीकृत पुरवठादाराकडून येतात कि नाही ? याची कागदपत्रांसह तपासणी करावी. (पशूसंवर्धन खाते आतापर्यंत वरील सर्व गोष्टींपैकी काहीच करत नसल्याने गोरक्षक सर्व तपासणी करत असत. अशा निद्रिस्त पशूसंवर्धन खात्याला शेवटी पंतप्रधान कार्यालयाने जागे करावे लागले ! – संपादक)
गोव्यात ‘गोवा मांस प्रकल्प’ असल्याने येथे गोमांस आणण्याची आवश्यकता नाही
पशूसंवर्धन खात्यातील अधिकारी म्हणाले, ‘‘गोव्यातील गोमांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी गोवा मांस प्रकल्प आहे. गोव्यात इतर राज्यांतून गोमांस आणण्याची आवश्यकता नाही; मात्र प्रकल्पात हत्या करण्यासाठी जनावरे आणावी लागतात. मासांची तस्करी रोखण्यासाठी खाते आणि सरकार प्रयत्नशील आहे. लोकांनीही जागरूक राहून तस्करी लक्षात आल्यास खात्याला त्याची माहिती द्यावी.’’