Ajit Doval On Religious Conflicts : धार्मिक ओळखीशी संबंधित वाद टाळण्यासाठी विचारांचा मुक्त प्रवाह अत्यंत आवश्यक !

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे इस्लामशी संबंधित वक्तव्य

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

नवी देहली – धार्मिक ओळखीशी संबंधित वाद टाळण्यासाठी विचारांचा मुक्त प्रवाह अत्यंत आवश्यक आहे. धर्म आणि देश यांप्रती असलेल्या निष्ठेविषयी कोणतीही तडजोड करू नये, असे विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी येथे केले. येथे आयोजित पुस्तक मेळ्यात २ फ्रेब्रुवारी या दिवशी तुर्की-अमेरिकन विद्वान अहमद टी. कुरु यांच्या ‘इस्लाम, ऑथरिटेरियनिझम् अँड अंडर डेव्हलपमेंट’ (इस्लाम, हुकुमशाहीवाद आणि विकासाधीन) या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. डोवाल यांनी या मेळ्यात धार्मिक ओळखीशी, मुख्यत्वे इस्लामशी संबंधित विषयांवर चर्चा केली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणाले,

१. धर्म आणि देश यांच्यातील संबंध ही इस्लाममध्ये एक अद्वितीय घटना नाही. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ही संकल्पना पालटली गेली. अब्बासी राजवटीत राज्ये आणि इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) यांची भूमिका वेगळी होती. ‘प्रिंटिंग प्रेस’ स्वीकारण्यासाठी इमाम समुदायाकडून खूप विरोध झाला. ज्या पिढ्या चौकटीबाहेर विचार करू शकत नव्हत्या, त्या निष्क्रीय झाल्या.

२. हिंदु धर्मात वाद-विवाद शास्त्रार्थ आणि ध्यान यांद्वारे सोडवले जात होते.

३. धर्म आणि विचारसरणी (विचारमंथन) एकमेकांशी स्पर्धा करत नसतील, तर ते मोठ्या प्रमाणात निष्क्रीय होतील. ते निष्क्रीयतेचे बळी ठरतील आणि शेवटी नष्ट होतील.

४. आपल्याला कोणताही पालट किंवा विकास हवा असेल, तर काही समाज का निष्क्रीय झाले आहेत, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. ज्या समाजांना चौकटीच्या पलीकडे पहाता येत नव्हते किंवा नवीन कल्पना निर्माण करता येत नव्हत्या, ते कदाचित् एका वेळी पूर्णपणे स्थिर झाले.