साधिकेला तिच्या मनाच्या स्थितीनुसार सेवेविषयी मार्गदर्शन करून तिला घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या समवेत सेवा करायची संधी मिळते. अनेकदा त्यांनी मला दिलेली सेवा करण्याची माझी क्षमता नसते, तसेच ती सेवा करण्यासाठी आवश्यक असणारे गुणही माझ्यात नाहीत; परंतु त्या अत्यंत विश्वासाने मला विविध प्रकारच्या सेवा देत आहेत.

‘माझ्या मनाच्या स्थितीनुसार त्या मला सेवेविषयी मार्गदर्शन करतात’, असे मला जाणवले, उदा. सेवा करतांना माझ्या मनात नकारात्मक विचार आले किंवा माझा आत्मविश्वास न्यून पडला, तर त्या मला प्रोत्साहन देतात. हे स्वभावदोष दूर करण्यासाठी त्या मला स्वयंसूचना देऊन प्रयत्न करायला सांगतात. कधी कधी त्या मला हक्काने ‘तुला ती सेवा करायचीच आहे’, असेही सांगतात.

त्यांनी मला वरीलप्रमाणे मार्गदर्शन केल्यानंतर त्या सेवेविषयी माझ्या मनात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे ‘सेवेचे एखादे सूत्र आणखी कसे हाताळायला हवे ? त्यात आणखी काय बारकावे असू शकतात ?’, हे माझ्या लक्षात येऊ लागते.

एकदा त्यांनी मला एक सेवा करण्यास सांगितली. त्या वेळी त्यांनी मला ती सेवा करण्यापूर्वी ‘सेवेत कोणतेही अडथळे न येण्यासाठी सिद्धिविनायकाला प्रार्थना करणे आणि सूक्ष्मातून स्वतःभोवती नामजपाचे मंडल करणे’, हे प्रयत्न करायला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रयत्न केल्यावर ‘सिद्धिविनायक माझी प्रार्थना ऐकत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे मला ‘आता ही सेवा निर्विघ्नपणे पार पडणार’, असा आत्मविश्वास वाटला. त्यानंतर मी ती सेवा केली आणि ती निर्विघ्नपणे पार पडली. ही सेवा करतांना ‘स्वतःच्या मनाला काय जाणवले ?’, याचा विचार करतांना मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

‘गुरु जेव्हा सेवा सांगतात, तेव्हा ते ती सेवा करण्याची क्षमताही आपल्यामध्ये निर्माण करतात’, हे मला अनुभवता आले.’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२४)


श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधिकेला घडवण्यासाठी घेत असलेल्या कष्टांविषयी तिने पत्राद्वारे व्यक्त केलेली कृतज्ञता !

सौ. स्‍वाती शिंदे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई,

तुम्ही मला पुष्कळ विश्वासाने विविध सेवा देता. आज मला वाटले, ‘जसे लहानपणी शिक्षक हाताला धरून मुळाक्षरे गिरवून घेतात, तसेच अध्यात्माच्या या शाळेत तुम्ही माझ्याकडून माझ्या मनाच्या पाटीवर साधनेचे योग्य संस्कार गिरवून घेत आहात.’ खरंच, किती खोलात जाऊन तुम्ही मला घडवत आहात ! अगदी ‘कोणत्या शब्दांत बोलायला हवे ?’, हे सांगायलाही तुम्ही मला वेळ देत आहात.

‘मला घडवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेत आहात, त्याबद्दल माझ्या मनात सतत कृतज्ञताभाव राहू दे आणि मला लवकरात लवकर तुम्हाला अपेक्षित अशी आध्यात्मिक प्रगती करता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !

– सौ. स्वाती संदीप शिंदे (९.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक