भारतीय इतिहासातील गोंधळ !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

१२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे आणि त्यामागील कारणांचा मागोवा’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

भाग ५० वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/833395.html

(भाग ५१)

प्रकरण ९

पू. प्रा. सु.ग. शेवडे

२. आर्य कोण आणि कुठले ?

आर्य-अनार्य वाद हा आमच्या इतिहासातील एक क्रमांकाचा खोटेपणा आहे. मॅक्समुल्लरने भाषाशास्त्राला हाती धरून अशी समजूत प्रसृत केली की, संस्कृत, ग्रीक, लॅटिन इत्यादी भाषांत जी पुष्कळशी सरूपता दिसते, त्याचे मूळ कारण हे सारे लोक एकवंशी असून पूर्वी केव्हातरी एके ठिकाणी रहात असावेत. या वंशाला ‘आर्यन वंश’ असे नाव मिळाले. अशा प्रकारे विषार पसरवून तो हळूच म्हणतो, ‘आर्यन’ ही संज्ञा मी भाषेला लावतो. कोणत्याही मानववंशाला लावत नाही.’ त्याने आपले सर्व सिद्धांत मानववंशाची कल्पना गृहित धरूनच उभारले आहेत.

आम्हाला गेल्या ७ – ८ पिढ्यांपासून असेच शिकवले गेले आहे की, आर्य हे आक्रमक, परके आहेत. आम्ही जर त्यांचे वंशज असू, तर आमचीसुद्धा पितृभूमी, मातृभूमी अन् पुण्यभूमी भारत देश नव्हे.

मुळात ‘आर्य’ हा खरोखरच जातीवाचक शब्द नाही. आर्य नावाचे कुणी लोक होते, हे खोटे आहे. ‘आर्य’ म्हणजे सज्जन, श्रेष्ठ, धर्मानुसार वागणारा, समोरच्याला सन्मानार्थ संबोधतांना ‘आर्य’ म्हणत. सुजन नसलेला, भित्रा आणि हीन तो अनार्य.

‘आता आर्य हे मूळचे मध्य आशियाचे आणि नंतर ते युरोप, आशिया इत्यादी भागांत पसरले’, ही कल्पना धादांत खोटी आहे. ‘कृण्वन्तो विश्वं आर्यम् ।’ याचा अर्थ ‘संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजेच सुसंस्कृत करू’ असा आहे. ही घोषणा ‘आर्य’ शब्द जातीवाचक नसून गुणदर्शक आहे, हे सिद्ध करायला पुरेशी आहे.

३. देशात खोटाच इतिहास शिकवला जाणे

या अगदी आरंभीच्या घोटाळ्याने आमचा इतिहास विकृत करून सोडला आहे. आम्ही अजूनही हा खोटा इतिहास आमच्या देशात शिकवणे चालू ठेवले आहे. ‘भारतावर इंडो आर्यन आक्रमण झाल्याचा उल्लेख ऋग्वेदात नाही’, असे विधान प्रो.टी. मूरो यांनी ‘संस्कृत-भाषा’ या त्यांच्या पुस्तकात केले आहे. आणखी एक पुरावा म्हणजे संस्कृतातील संभाषणात अनेक व्यक्ती एकमेकांना ‘आर्य’ या संबोधनाने बोलतात. ते दोघेही आर्य असतील, तर एकमेकांना ‘आर्य’ कशाला म्हणतील ? आता गंमत अशी आहे की, आर्य इथे बाहेरून आले, ही तर थाप आहेच; पण सत्य हे आहे की, भारतीय योद्धे भारतातून बाहेर जाऊन पुष्कळ पराक्रमकर्ते झाले. येथील विद्वान, गणिती यांनी आपली शास्त्रेही बाहेर नेली.

पुराणकाळातील संदर्भांमागील सत्य-असत्य !

१. रामायणकाळ

श्रीरामाचा काळ त्रेतायुगाच्या शेवटी झाला. त्यानंतर द्वापरयुगाची ८ लक्ष ६४ सहस्र वर्षे गेली. कलियुगाची ५ सहस्र १०८ वर्षे झाली, म्हणजेच रामराज्याला सुमारे ९ लक्ष वर्षे झाली. हे भारतीय परंपरांना खोटे ठरवणार्‍यांना कसे पटावे ? भारतीय कालगणनेनुसार मानवी संस्कृती लाखो वर्षांची जुनी असून तिला अनेक चढ-उतार पहावे लागले आहेत. रामायणात ४ दातांच्या हत्तींचे उल्लेख आले आहेत. पुरातत्ववादी म्हणतात की, सुमारे १० लक्ष वर्षांपूर्वी ४ दातांचे हत्ती नष्ट झाले, म्हणजेच रामायणात वर्णन केलेली लंका १० लक्ष वर्षांपूर्वीची होती. ग्रहगतीशास्त्रानुसार पाहिले, तर लंकेत सीतेला अशोकवनात ठेवण्यात आले होते, त्या वेळी मंगळकृत रोहिणीशकट भेद हा योग होता. हा सुमारे ८ – ९ लक्ष वर्षांनी येणारा योग आहे.

२. आद्यशंकराचार्य आणि वास्तव

आद्य शंकराचार्य इ.स.पू. ५०९ मध्ये जन्माला आले. ही गोष्ट सिद्ध करणारी अनेक साधने आहेत. शंकराचार्य पीठांच्या अनेक सूचीसुद्धा आहेत; परंतु इ.स. ७८८ मध्ये जन्मलेले अभिनव सच्चिदानंद धीरशंकर यांच्या चरित्रातील अनेक स्थळे आद्यशंकराचार्यांशी जुळणारी वाटल्यामुळे त्यांनाच ‘आद्यशंकराचार्य’ ठरवण्यात आले. ते मूळ आचार्यांनंतरचे ३८ वे शंकराचार्य होते.

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

भाग ५२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/835050.html