उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा केल्यास, श्री गणेशाची कृपा संपादन करता येईल ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि. कंपनी’त व्याख्यान  !

व्याख्यानाला आस्थापनाचे उपस्थित कर्मचारी आणि अन्य

पुणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) – कोथरूड येथील ‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि. कंपनी’च्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश विनायक कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदर्श गणेशोत्सव कसा असावा ?’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ‘प्रत्येक शुभकार्यात प्रथम श्री गणेशाचे पूजन का केले जाते ? श्री गणेशाची मूर्ती निवडतांना सात्त्विक मूर्तीची निवड कशी करावी ? श्री गणेशाच्या पूजनातील विविध कृतींचे शास्त्र, ज्येष्ठा गौरी पूजनाचे शास्त्र’ याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

व्याख्यान देतांना कु. क्रांती पेटकर

या वेळी हौदात विसर्जन करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तींची नंतर कशा पद्धतीने विटंबना होते ? या संदर्भातील विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या आणि वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात आलेल्या बातम्यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले, तसेच धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यामागचे शास्त्रही सांगण्यात आले. याला उपस्थित जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय आस्थापनातील सर्व कर्मचार्‍यांपर्यंत पोचावा, अशी कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी यांची पुष्कळ तळमळ होती. त्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाचे आवर्जून आयोजन केले होते.या वेळी ‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि. कंपनी’चे कर्मचारी आणि इतर मान्यवर असे १७५ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण 

१. व्याख्यान झाल्यानंतर उपस्थितांनी शंकांचे निरसनही जिज्ञासेने करून घेतले.

२. कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या संचालिका सौ. मृणाल कुलकर्णी यांनी स्वतः यापुढे इतरही विषयांवरील व्याख्यान पुन्हा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.