कुंभपर्वातील स्नानासाठी वापरण्‍यात येणारा ‘शाही’ शब्‍द हटवणार ! – श्री महंत रवींद्र पुरी महाराज, अध्‍यक्ष, आखाडा परिषद

  • ‘शाही’ हा उर्दू शब्‍द असल्‍याने घेतला निर्णय !

  • ‘राजसी स्नान’ असा शब्‍दप्रयोग करणार; प्रयागराज कुंभपर्वापासून आरंभ !

श्री महंत रवींद्र पुरी महाराज

प्रयागराज – कुंभपर्वातील मुख्‍य स्नानासाठी ‘शाही स्नान’ असा शब्‍दप्रयोग करण्‍यात येतो. तथापि ‘शाही’ हा उर्दू शब्‍द असल्‍याने सर्व आखाड्यांशी चर्चा करून हा शब्‍द हटवण्‍यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्‍यक्ष श्री महंत रवींद्र पुरी महाराज यांनी दिली. ‘शाही’ या शब्‍दाला पर्याय म्‍हणून ‘राजसी’ (राजासाठी योग्‍य) हा शब्‍द वापरण्‍यात येणार आहे. १३ जानेवारी २०२५ पासून प्रयागराज येथे चालू होणार्‍या कुंभपर्वापासून ‘राजसी स्नान’ हा शब्‍द वापरण्‍यास आरंभ करण्‍यात येईल, असे पुरी महाराज यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी उज्‍जैन येथील श्री महाकालेश्‍वर देवाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणुकीला ‘शाही सवारी’ असे संबोधण्‍यात येते. मध्‍यप्रदेशचे मुख्‍यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या मिरवणुकीचा उल्लेख ‘राजसी सवारी’ असा सर्वप्रथम केला. त्‍यानंतर सर्व महंत, साधू, संत आदींनी कुंभपर्वात होणार्‍या ‘शाही स्नान’ शब्‍दप्रयोगातील ‘शाही’ शब्‍दावर आक्षेप घेत तो हटवण्‍याची मागणी केली.

पराधीनतेची आठवण करून देणारा शब्‍द हटवा ! – महामंडलेश्‍वर शैलेशानंद महाराज, जुना आखाडा

जर कुठलाही शब्‍द पराधीनता, आतंक किंवा कटू आठवणी यांना उजाळा देत असेल, तर तो शब्‍द हटवला पाहिजे.

आक्रमकांच्‍या स्‍मृतींना उजाळा देणार्‍या शब्‍दांचा वापर नको ! – महामंडलेश्‍वर अतुलेशानंद महाराज, आव्‍हान आखाडा

सनातन धर्मात कुठल्‍याही आक्रमकांच्‍या स्‍मृतींना उजाळा देणार्‍या शब्‍दांचा वापर होऊ नये. आपली प्राचीन परंपरा जोपासली गेली पाहिजे. त्‍यासाठी ‘शाही’ शब्‍द हटला पाहिजे आणि त्‍या जागी ‘राजसी’ हाच शब्‍द वापरला पाहिजे.