देशामध्ये शासनकर्त्यांनी लोकांना नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहायला शिकवायला हवे. आज सरकार अमुक योजना, तमुक योजना असे करून लोकांना अनुदान देत आहे. नागरिक त्या आमिषांमध्ये अडकत जात आहेत. तो पैसा खरेतर करदात्या नागरिकांचाच आहे. खरेतर लोकांनी स्वत:चे घर सांभाळून देशासाठी स्वत:चे कर्तव्य पार पाडायला हवे; पण आज सरकार लोकांची कर्तव्ये काय आहेत ? आणि ती कशी आहेत ? हे त्यांना शिकवण्याऐवजी मतांसाठी विविध योजना सिद्ध करून लोकांना आमीष दाखवत आहे. यात खरे हित आहे का ?
आदर्श राष्ट्राच्या दृष्टीने लोकांना त्यागाची सवय लावायला हवी. समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याचा विचार लोकांच्या मनात रुजवायला हवा. आपले सरकार लोकांच्या मनात सवलती, योजना, आरक्षण देण्याच्या माध्यमातून काय निर्माण करत आहे ? आरक्षणासाठी विविध आंदोलने चालू आहेत. सवलती मिळाव्यात यासाठी आंदोलने चालू आहेत. सरकार आश्वासने देते. यातून समाजाची काय मानसिकता सिद्ध होत आहे ? ‘ज्याला जे काही हवे, ते त्याला सरकार देते. ज्याला जे हवे ते तो मागतो आणि सरकार देते.’ असे किती दिवस आपण मागत रहाणार ? आणि सरकार देणार तरी कुठून ? हा राज्याचा पैसा, देशाचा पैसा नागरिकांचाच आहे. तो सामाजिक कार्यासाठी योग्य तर्हेने वापरला जायला हवा. लोकांचा पैसा लोकांना मिळावा, हे योग्य आहे; पण लोकांचा पैसा लोकांना योग्य मार्गाने, म्हणजे देशाच्या विकासासाठी रस्ते, पाणी, रचना अशा लोकांच्या हिताच्या गोष्टींसाठी वापरायला हवा.
लोकांची मानसिकता ‘घेण्याची’ नको, तर ‘देशासाठी देशाच्या हितासाठी काहीतरी करायला हवे’, अशी त्यागाची भावना निर्माण करणारी हवी. ईश्वराने हे सर्व जग निर्माण केले आहे. यामध्ये ईश्वराने ठरवून दिलेली आपली कर्तव्ये आहेत. ती आपल्याला करायला हवीत. देवऋण, ऋषीऋण, समाजऋण हे फेडण्यासाठी आपण जन्मलो आहोत, याचे आपल्याला भान असायला हवे. सरकार देण्या-घेण्यात लोकांना अडकवत आहे. त्यापेक्षा राजा म्हणून आपली कर्तव्ये काय आहेत ? त्या कर्तव्यांकडे कटाक्षाने लक्ष दिले, तर कोणत्याही समस्या रहाणार नाहीत. सर्व समस्यांना योग्य मार्ग मिळेल. हीच आपली हिंदु धर्माची शिकवण आहे. आज कित्येक विदेशी राष्ट्रांनी पुष्कळ प्रगती केली आहे. त्यांच्या प्रगतीचे गमक हे तेथील नागरिकांची ‘राष्ट्राप्रतीची कर्तव्ये निभावण्याप्रती असलेली निष्ठा’, हे आहे, असे लक्षात येते. राष्ट्रासाठी सामान्य नागरिकाने त्याग करण्याची वृत्ती तुलनेने भारतियांमध्ये अल्प आढळते. त्यामुळे शासनकर्त्यांनी सत्तास्वार्थासाठी देण्याची सवय लावण्यापेक्षा राष्ट्रासाठी योग्य मतदान करण्याचे आवाहन करायला हवे !
– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.