Yogi Adityanath : कोणतेही संत आणि योगी सत्तेचे गुलाम असू शकत नाहीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती !

चंदौली (उत्तरप्रदेश) – कोणतेही संत, महात्मा आणि योगी कधीही कोणत्याही शक्तीचे, सत्तेचे गुलाम होऊ शकत नाहीत, उलट ते समाजाला त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते अघोराचार्य बाबा कीनाराम यांच्या ४२५ व्या जयंती सोहळ्यात बोलत होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, बाबा कीनाराम यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग देश आणि लोक यांच्या कल्याणासाठी केला. त्या वेळची समाजाची विकृती पाहून त्यांनी समाजाला जोडण्याचे काम केले. त्यांनी आदिवासी, दलित, वनवासी असा भेदभाव विरहित सुंदर समाजाच्या स्थापनेची ज्योत उभारली. अघोराचार्य, योगी आणि संत यांच्यामुळेच हे शक्य झाले. उच्चभ्रू कुटुंबात जन्माला येऊनही बाबांनी मोठ्या संख्येने आदिवासी आणि इतर लोक यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. वेळोवेळी सरकारला फटकारण्याचे कामही त्यांनी केले. चंदौली येथे वैद्यकीय महाविद्यालय बांधले जात असतांना ‘बाबांच्या नावाने काहीतरी केले पाहिजे’, अशी भूमिका आमदार आणि खासदार यांनी मांडली होती, तेव्हा ‘वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा चांगले काय असू शकते ?’, असे मी म्हटले होते. पूज्य बाबांच्या नावाने उभारले जाणारे वैद्यकीय महाविद्यालय आता लोकांच्या उत्तम आरोग्याचे माध्यम बनेल, हे आपले भाग्य आहे.

संपादकीय भूमिका

याचाच अर्थ राजकारणी सत्तेची गुलाम असतात आणि ही गुलामी करण्यासाठी ते जनतेला स्वतःचे गुलाम बनवतात ! अशा राजकारण्यांपासून देशाला मुक्त करून धर्माचरणी शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !