गणेशोत्सवासाठी राज्य पातळीवर ३ सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण

स्थानिक प्रवाशांना असुविधा !

श्री. अजय केळकर, कोल्हापूर

कोल्हापूर – गणेशोत्सवासाठी नोकरी करणारे मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात जातात. त्यांची सोय होण्यासाठी प्रतिवर्षी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ‘एस्.टी.’ आगारातून मोठ्या संख्येने गाड्या मागवल्या जातात. या गाड्या चालकासह ८ ते १० दिवस संबंधित आगारातून मुंबई, कोकण येथे जातात. प्रवासी पूर्ण गाडीचे आरक्षण करतात. यंदाही प्रवाशांकडून ३ सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक आगारात मोठ्या प्रमाणात गाड्यांचा तुटवडा निर्माण होतो आणि स्थानिक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधांना सामोरे जावे लागते. अगोदरच गाड्यांची संख्या ही प्रत्येक आगारात मर्यादित असल्याने संबंधित एस्.टी.च्या अधिकार्‍यांनाही नियोजन करतांना नाकी नऊ येतात.

एस्.टी.कडे सध्या १६ सहस्रांच्या आसपास गाड्या असून त्यांतील ५ सहस्र गाड्यांची वापरण्याची मर्यादा पूर्ण झाली आहे. गेली अनेक वर्षे एस्.टी.ला मोठ्या प्रमाणात गाड्या नसल्याने नादुरुस्त असलेल्याच गाड्या वारंवार दुरुस्त करून वापरण्यात येत आहेत. एस्.टी. महामंडळाने डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्याने ८ सहस्र नवीन गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यांतील पहिल्या टप्प्यात २ सहस्र २०० गाड्या या मार्च २०२४ पर्यंत येणार होत्या; मात्र लोकसभा निवडणुकीमुळे ही प्रक्रिया रखडली होती. यानंतर निवडणूक होऊनही ३ महिने उलटले, तरी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अगोदरच जवळपास प्रत्येक आगारात गाड्यांचा तुटवडा भासत असतांना या गाड्या मुंबई-कोकण येथे जात असल्याने स्थानिक प्रवाशांना गाड्या कोठून उपलब्ध करून द्यायच्या ? हा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यातील अधिकार्‍यांसमोर आहे.

जसे नोकरी करणारे मुंबईतून कोकणात जातात, त्याचप्रमाणे अनेक भाविक हे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, संभाजीनगर, नाशिक, तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही परत जातात. हे प्रवासी त्या जिल्ह्यातील स्थानकांवर आल्यावर तेथील त्यांच्या गावांमध्ये जातात, तेव्हा या प्रवाशांना आता गाड्या कुठून उपलब्ध करून द्यायच्या ? याचसमवेत राज्यात अनेक असे प्रवासी आहेत की, जे ग्रामीण भागात जाण्यासाठी एस्.टी.वरच अवलंबून असतात. त्यांनाही गाड्या कुठून उपलब्ध करून द्यायच्या ? असाही प्रश्न संबंधित अधिकार्‍यांसमोर आहे. गणेशोत्सव संपल्यावर काही मार्गावर प्रवासीवर्ग परत जातो, जसे कोल्हापूर-पुणे, सांगली-पुणे, नाशिक-पुणे, संभाजीनगर-पुणे या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी असतात. त्यांनाही दीर्घकाळ गाड्यांसाठी प्रतिक्षा करावी लागते.

या गाड्या संबंधित जिल्ह्यातून मुंबई येथे जातांना प्रवासी मिळाल्यास घेऊन जातात, तसेच कोकणातून प्रवासी मिळाल्यास ते घेऊन परत येतात. असे प्रवासी न मिळाल्यास या गाड्या रिकाम्याच न्याव्या लागतात आणि रिकाम्याच कोकण येथून संबंधित आगारात आणाव्या लागतात. यामुळे एस्.टी.ला तोटा सहन करावा लागतो, तो वेगळाच. अनेक जिल्ह्यांमध्ये गाड्यांची उपलब्धता नसल्याने एस्.टी.चे आरक्षण होत नाही. त्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना खासगी गाड्यांकडे वळावे लागते आणि ते मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून दर घेऊन त्यांना लुटतात.

प्रत्येक वर्षी ही समस्या स्थानिक ठिकाणी भेडसावते. यंदा लवकरच विधानसभांच्या निवडणुका असल्याने या गाड्या अधिक संख्येने आरक्षित झाल्यास आहेत. तरी यावर एस्.टी. महामंडळाने आता कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यासाठी लवकरात लवकर अधिक संख्येने गाड्या खरेदी करणे आवश्यक आहे, तरच या समस्येवर मार्ग निघू शकेल.

संपादकीय भूमिका 

गणेशोत्सवातील अधिक बसगाड्यांची मागणी लक्षात घेता नवीन गाड्या खरेदी करून त्यांचा वापर होण्याची प्रक्रिया आधीच का झाली नाही ?