प्रदूषित इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी कोट्यवधींचा व्यय !

पिंपरी (पुणे) – पवित्र इंद्रायणी नदी पवना नदीपेक्षा अधिक प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदीतील पाणी शुद्धीकरणासाठी महापालिकेला अधिकचा व्यय करावा लागत आहे. पवना नदीतील ५१० दशलक्ष लिटर (एम्.एल्.डी.) पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला १० कोटी रुपये व्यय होतात, तर इंद्रायणी नदीतील ८० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरणासाठी ७ कोटी रुपये व्यय होतात, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

पवना धरणांतून नदीवाटे आलेले पाणी रावेत येथील बंधार्‍यातून उचलले जाते. निगडी विभाग क्र. २३ येथे शुद्ध करून शहराला वितरित केले जाते. आंद्रा धरणातील पाणी निघोज येथील इंद्रायणी नदीतील बंधार्‍यातून घेतले जाते. नदीलगत चाकण, तळेगाव दाभाडे औद्योगिक विकास महामंडळ (एम्.आय.डी.सी.) परिसर आहे. या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. ते सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळले जाते.

औद्योगिक आस्थापनांतील रसायनमिश्रित पाणीही नदीमध्ये सोडले जाते. (पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषित करणार्‍यांवर प्रशासनाने थेट कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक) इंद्रायणीचे पाणी अधिक प्रदूषित असल्याने शुद्धीकरणासाठी केमिकल आणि पावडर यांचा अधिकचा वापर करावा लागतो. परिणामी इंद्रायणीतून उचलण्यात येणार्‍या ८० दशलक्ष लिटर पाण्यावरील प्रक्रियेसाठी वर्षाकाठी ७ कोटी रुपयांचा व्यय करावा लागत आहे.

संपादकीय भूमिका

  • कोट्यवधी रुपये व्यय करूनही नदीचे प्रदूषण अल्प न होणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • नदीमध्ये मिसळले जाणारे सांडपाणी बंद करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !