पुणे-बिकानेर एक्सप्रेस रेल्वे मिरज-बिकानेर अशी धावणार !

सांगली आणि किर्लाेस्करवाडी येथे थांबा !

प्रतिकात्मक चित्र

मिरज, २७ ऑगस्ट (वार्ता.) – पुणे ते बिकानेरपर्यंत चालू असलेली साप्ताहिक रेल्वे एक्सप्रेस आता मिरज येथून बिकानेरपर्यंत थेट एकाच क्रमांकाने धावणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या एक्सप्रेसला सांगली आणि किर्लाेस्करवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. गेल्या वर्षभरापासून मिरज येथून सुटणारी ही एक्सप्रेस ‘पुणे-बिकानेर एक्सप्रेस’ म्हणून धावत होती. आता ती थेट ‘मिरज-बिकानेर’ म्हणून २०४७६ या क्रमांकाने धावणार आहे. ही एक्सप्रेस मिरज येथून प्रत्येक मंगळवारी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुटेल, तर सांगली स्थानकांवरून २ वाजून ४० मिनिटांनी आणि किर्लाेस्करवाडी स्थानकातून ३ वाजता सुटणार आहे.