पोलीस ठाण्यात नाचणार्‍या २ महिला पोलिसांसह चौघे निलंबित !

नागपूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडली घटना !

नागपूर – स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘डॉन’ या हिंदी चित्रपटातील गाण्यावर नाचणार्‍या येथील पोलीस ठाण्यातील ४ पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात २ महिला पोलिसांचा समावेश आहे. त्यांच्या कृत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. पोलीस शिपाई डॉली उपाख्य भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर अन् पोलीस हवालदार अब्दुल गणी अशी त्यांची नावे आहेत.

गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही ! – पोलीस उपायुक्त

नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले की, गणवेश घालून अशा प्रकारची गैरवर्तणूक करणे खपवून घेतले जाणार नाही. पोलीस गणवेशात नाचणार्‍या ४ पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खाकी वर्दीची प्रतिमा मलीन होईल, असे कोणतेही कृत्य पोलिसांनी करू नये.

शहरातील तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर ध्वनीक्षेपकावर देशभक्तीपर गाणी वाजवण्यात येत होती. त्या वेळी एका पोलीस कर्मचार्‍याने लावलेल्या हिंदी चित्रपटातील गाण्यावर वरील ४ पोलिसांनी नाच केला.

संपादकीय भूमिका :

  • स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्तीपर गाणी लावून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तर दूरच; पण चित्रपटातील गाण्यावर नाचणे हे पोलिसांना अशोभनीय !
  • कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक म्हणवले जाणार्‍या पोलिसांनाच वागण्याचे भान नसणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !