आतापर्यंत सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी २४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली – महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि ओडिशा येथे नक्षलवादी कारवाया करणारी कट्टर महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उपाख्य सोनी उपाख्य सरिता उपाख्य कविता (वय ४० वर्षे) हिने आत्मसमर्पण केले आहे. एका सरपंचासह २ निरपराध व्यक्तींचा खून, तसेच पोलिसांच्या ७ चकमकीत संगीताचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप आहे. जहाल कारवायांमुळे महाराष्ट्र शासनाने तिच्यावर ६ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते. संगीता वयाच्या १६ व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील होऊन तिने शस्त्र हाती घेतले. तिने सन्मानाने जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण केले आहे. याच उद्देशासाठी वर्ष २०२२ पासून आतापर्यंत २४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
‘नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे; मात्र जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील, त्यांना लोकशाही मार्गाने सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी साहाय्य करेल’, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.