मुंबई – ‘सेंट्रल प्रोव्हिजन रेल्वे कंपनी’ या खासगी ब्रिटीश आस्थापनाने महाराष्ट्रातील अमरावती ते मूर्तजापूर हे १९० कि.मी. रेल्वेरूळ वर्ष १९१६ मध्ये बांधले होते. इंग्रज भारतातून गेल्यावर, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावरही या आस्थापनाला अनेक दशके १ कोटी २० लाख रुपये भाडे म्हणून द्यावे लागत होते. वर्ष १९५१ मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाल्यावर भारताने अनेक प्रयत्न करूनही ब्रिटिशांनी हे रेल्वेरूळ भारताला दिले नाहीत. अमरावतीहून कापूस मुंबईला आणण्यासाठी इंग्रजांनी हे रेल्वेरूळ बांधले होते.
या मार्गावर अचलपूर ते यवतमाळ शकुंतला एक्सप्रेस रेल्वे धावत होती. ७० वर्षे ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालू होती. वर्ष १९९४ मध्ये त्याला डिझेलचे इंजिन जोडण्यात आले. सध्या ही गाडी बंद करण्यात आली असून ती चालू करण्याची नागरिकांची मागणी आहे. ५ डब्यांची ही गाडीतून प्रतिदिन १ सहस्र प्रवासी प्रवास करत होते. सध्या हे भाडे द्यावे लागत नाही, असे समजते.