७५ किलो गांजा आणि ४ सहस्र ८०० कोडीनच्या बाटल्या जप्त
६ जणांना अटक
मुंबई – उल्हासनगर परिसरात कोडीनच्या (एक प्रकारचे औषध) बाटल्यांची तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ७५ किलो गांजा आणि ४ सहस्र ८०० कोडीनच्या बाटल्या, असा १ कोटी ७५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असून या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
परीक्षेत कॉपीसाठी साहाय्य करणारे ३ पोलीस निलंबित !
कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार !
नागपूर – शहरातील पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत उमेदवाराला कॉपीसाठी साहाय्य करणार्या पोलीस उपनिरीक्षकासह २ हवालदारांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. २८ जुलैला झालेल्या लेखी परीक्षेत केंद्रावरील पर्यवेक्षक आणि साहाय्यक म्हणून कर्तव्यावर असतांना संबंधितांनी उमेदवाराला कॉपी करण्यास साहाय्य केले होते. यासंदर्भात इतर उमेदवारांनी वरिष्ठ अधिकार्यांना तक्रार केली. त्यानंतर अन्वेषण करून पोलीस आयुक्तांनी तिघांनाही ३ महिन्यांसाठी निलंबित केले.
जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबईत पाणीटंचाई
नवी मुंबई – नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणीपुरवठा करणारी वाहिनी बेलापूर येथे फुटल्याने १० ऑगस्टपासून शहरात पाणीपुरवठा झाला नाही. ऐरोली, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे आणि सानपाडा येथील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या वाहिनीची दुरुस्ती कधी पर्यंत होईल ? पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल ?, अशी कुठलीही सूचना न दिल्याने शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
गोव्यातून जळगावमार्गे हैद्राबाद आणि पुणे अशी विमानसेवा चालू होणार
जळगाव – येथील विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ या विमान आस्थापनाची ‘गोवा- जळगाव-हैदराबाद’ आणि ‘गोवा-जळगाव-पुणे’ अशी विमान सेवा चालू करण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबरपासून प्रतिदिन गोवा-जळगाव-हैदराबाद अशी विमान सेवा चालू करण्यात येणार आहे.