बीट अंमलदार आणि प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाईचे आदेश !

पुणे येथील तक्रारदारांची तक्रार प्रविष्ट करून न घेतल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

कळस (तालुका वालचंदनगर) – पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची तक्रार घेऊन गेल्यानंतरही तक्रार प्रविष्ट न केल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन बीट अंमलदार मोहन ठोंबरे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक यांना दोषी ठरवून अन् त्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने दिले आहेत. सुनील खारतोडे यांनी बीट अंमलदारांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. बीट अंमलदार ठोंबरे यांनी आर्थिक देवाणघेवाण करून खारतोडे यांची तक्रार प्रविष्ट करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप खारतोडे यांनी केला आहे. (तक्रारदाराची तक्रार प्रविष्ट न करणारे पोलीस जनतेला कधी आधार देऊ शकतील का ? – संपादक)

प्राधिकरणाने दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि युक्तीवाद ऐकून घेतला. त्याअन्वये खारतोडे यांची तक्रार प्रविष्ट करणे आवश्यक होते; मात्र ठोंबरे यांनी तसे न करता कर्तव्यात कसूर केली, तसेच त्या वेळी तेथे कार्यरत असलेले प्रभारी पोलीस निरीक्षकही यासाठी तेवढेच उत्तरदायी असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचा आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे प्रशासकीय अधिकारी एस्.जे. खरात यांनी दिला.