देहली, उत्तरप्रदेशमधील मथुरा, नोएडा आणि फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली, उत्तरप्रदेशमधील मथुरा, नोएडा अन् फरिदाबाद (हरियाणा) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव २१ जुलै या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. महोत्सवाचा प्रारंभ श्री व्यास पूजनाने झाला. या वेळी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी देहली येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, मथुरा येथे समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, नोएडा येथे समितीचे श्री. श्रीराम लुकतुके अन् फरिदाबाद येथे समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी उपस्थितांना संबोधित केले. या गुरुपौर्णिमांच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

मथुरा (उत्तरप्रदेश)

रामराज्याच्या रूपाने हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे निश्चित ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

रामराज्य येण्यापूर्वी रावणाचा वध होणे, हे विधीलिखित होते. रावणाचा वध झाल्यावरच रामराज्य स्थापन झाले. त्याप्रमाणे आताही रामराज्याच्या रूपाने हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे निश्चित आहे. ३-४ वर्षांपूर्वी आपण कोरोना महामारीची भीषण परिस्थिती अनुभवली होती. जागतिक स्तरावरही गेल्या ३-४ वर्षांपासून सातत्याने युद्धजन्य परिस्थिती आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात युद्ध चालू आहे. इराणच्या संदर्भातही तणावाची परिस्थिती आहे. थोडक्यात तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल, हे सांगता येत नाही. या आणीबाणीविषयी त्रिकालदर्शी संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे. ‘या काळात पंचमहाभूतांचे रौद्र रूप पहायला मिळेल’, असेही एका संतांनी सांगितले आहे. आपणही गेल्या काही वर्षांत बिघडत चाललेले ऋतुचक्र अनुभवत आहोत. त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक साधनेचे बळ आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. मथुरा येथील श्रीजी बाबा सरस्वती (वि.प्र.) महाविद्यालयात आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते.

देहली

हिंदु संस्कृतीचा आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी हिंदूंनी कुटुंबासह तीर्थाटन करावे ! – सूर्या रॉय, इतिहासकार आणि तंत्रज्ञ

सूर्या रॉय

आज हिंदु स्वसंस्कृतीपासून लांब गेले आहेत. श्रीमद्भागवतात द्वारकेचा उल्लेख आहे. त्याच्या नगरीचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संशोधनात हिंदूंच्या या पौराणिक शहराविषयी बरीच माहिती आणि पुरावे सापडले आहेत. त्यामुळे सुट्ट्या घालवण्यासाठी आपण आपल्या मुलांसह अशा तीर्थक्षेत्री जायला हवे, जेणेकरून या नवीन पिढीलाही हिंदु संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाची माहिती मिळेल, असे उद्गार इतिहासकार आणि तंत्रज्ञ श्री. सूर्य रॉय यांनी काढली. खुराना बँक्वेट हॉल, देहली येथे साजरा करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.

नोएडा (उत्तरप्रदेश)

आज राष्ट्राला गुरु-शिष्य परंपरेची आवश्यकता ! – मनोशी सिन्हा रावल, सुप्रसिद्ध लेखिका

मनोशी सिन्हा रावल

वैदिक काळात गुरु-शिष्य परंपरेच्या अंतर्गत शिष्यांना उत्तम प्रकारे संस्कार दिले जात होते. त्यामुळे ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे चांगल्या प्रकारे पालन करत होते. अशाच शिक्षणाची आज आपल्या राष्ट्राला आवश्यकता आहे. जन्माच्या वेळी आई-वडील गुरु असतात. आपण जेव्हा शाळेत जातो, तेव्हा शिक्षक गुरु असतात आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला अध्यात्मातील उन्नत गुरूंची आवश्यकता असते, असे उद्गार सुप्रसिद्ध लेखिका मनोशी सिन्हा रावल यांनी काढले. नोएडा येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या.

फरिदाबाद (हरियाणा)

पालकांनी धर्माचरण केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल ! – अधिवक्ता मणि मित्तल, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता मणि मित्तल

आज समाजाला सामाजिक माध्यमांची जाणीव असून त्यामुळे समाजात विकृती वाढली आहे. सामाजिक माध्यमांवर पसरलेल्या गोंधळामुळे कुटुंबव्यवस्था खंडित होत आहे. हिंदी चित्रपट, सामाजिक माध्यमे आणि संकेतस्थळे यांचा प्रभाव केवळ हिंदु कुटुंबांवर पडला आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी पालकांनी स्वत: धर्माचरण करणे आवश्यक आहे. त्यांनी धर्माचरण केल्यास त्यांची मुलेही त्यांचे अनुकरण करतील. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणि मित्तल यांनी केले. जुने फरिदाबाद येथील श्री बांके बिहारी मंदिरात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या.