शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करतांना शिक्षकांनी गुरूंचे महत्त्व मुलांना सांगणे अपेक्षित !

हिंदु परंपरेमध्ये आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आषाढ पौर्णिमेच्या, म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोव्यासह भारतभरात अनेक संस्था गुरुपौर्णिमा साजरी करतात. अलीकडच्या काही निरीक्षणांमधून असे दिसून आले की, गोव्यातील काही शाळांमध्ये या दिवशी ‘मातृपूजन’ साजरे करून थोडासा एक वेगळा दृष्टीकोन निर्माण केला जात आहे.

१. माता आणि गुरु यांच्या भूमिका वेगवेगळ्या !

‘गुरुपौर्णिमा’ हा दिवस गुरु-शिष्य परंपरा साजरी करण्यासाठी समर्पित असून हिंदु धर्मातील धार्मिक संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. परंपरेच्या दृष्टीने गुरु हा शिक्षकापेक्षा पुष्कळ श्रेष्ठ आहे. शिष्याला अध्यात्मविषयक ज्ञान देऊन ईश्वरप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणार्‍या गुरूंचे स्थान हे उच्च आणि अनन्यसाधारण आहे. गुरूंची ही भूमिका वेगळी असून मुलांचे संगोपन करणार्‍या त्यांच्या पालकांच्या भूमिकेच्या पलीकडची आहे. पालकांचे मार्गदर्शन आणि गुरूंचे आध्यात्मिक मार्गदर्शन यांतील भेद हिंदु परंपरेमध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे.

श्री. नारायण नाडकर्णी

जेव्हा मुलावर मुंज किंवा उपनयन हा संस्कार केला जातो, तेव्हा त्या मुलाला आईवडिलांच्या नंतर गुरु मार्गदर्शन करतात. पूर्वीच्या काळी या धार्मिक विधीनंतर तो मुलगा गुरुगृही, म्हणजे गुरूंच्या छत्रछायेखाली राहून शिक्षण घेत असे. यावरून माता आणि गुरु यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, हे स्पष्ट होते. त्यामुळे गुरुपौर्णिमा साजरी करतांना ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगायला हवा. ‘गुरूंचे महत्त्व काय ?’, याविषयी मुलांना शिक्षण देणे, पालक आणि गुरु यांच्या वेगळ्या भूमिका स्पष्ट करणे, ज्ञान अन् आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवणे यांसाठी गुरूंचे महत्त्व सांगणे, हिंदु ग्रंथसंपदा आणि इतिहासातील गुरु-शिष्य यांच्या कथा मुलांना सांगणे या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत.

२. हिंदु परंपरेतील गुरूंचे आध्यात्मिक स्थान विशद करणे आवश्यक !

मातेला मान देण्याला महत्त्व आहे, याविषयी शंका नाही; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता आणि गुरु यांच्या भूमिकेत गल्लत करू नये. अशा प्रकारे मुलांपुढे चुकीचे सादरीकरण केल्याने माता आणि गुरु यांची आध्यात्मिक दृष्टीने असलेल्या भूमिकांविषयीच्या आदरभावावर वेगळा परिणाम होऊ शकतो. मुलांना सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शिक्षण अचूक देणे (विशेष करून पारंपरिक उत्सव साजरे करतांना) यांसाठी शैक्षणिक संस्थांचे महत्त्वाचे उत्तरदायित्व आहे. अशा महत्त्वाच्या संकल्पनांचे चुकीचे सादरीकरण केल्याने नवीन पिढीतील मुलांमध्ये हिंदु सांस्कृतिक परंपरेविषयी त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. जेव्हा आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, तेव्हा आपण त्यातील खरे सार आहे ते सांगतो आहोत ना ? याची खात्री केली पाहिजे. गुरु-शिष्याचे नाते आणि हिंदु परंपरेतील त्यांचे वेगळे स्थान यांविषयीचे आध्यात्मिक महत्त्व आपण ओळखले पाहिजे. असे केल्याने आपण केवळ या पवित्र दिवसाचा सन्मान करतो, असे नाही, तर पुढील पिढीपुढे हिंदु सांस्कृतिक वारशाची गहनता किती आहे, हे सांगतो, असे होईल. यामुळे पुढची पिढी संस्कृतीचा अभिमान असलेली निर्माण होईल, तसेच त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयीचे प्रेमही जागृत होईल.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (२२.७.२०२४)