आध्यात्मिक वारसा लाभलेला बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांचा परिवार !

श्रीमती पूर्णिमा प्रभु

१. आजी – कै. शांताबाई देसाई

अ. ‘माझी आजी (वडिलांची आई) पुष्कळच देवभोळी होती. ती पुष्कळ कर्मकांडे आणि उपवास करायची. तिच्या खोलीतील देव्हार्‍यात दत्तगुरूंचे मोठे चित्र होते; म्हणून कदाचित् आम्ही तिच्या खोलीतच अभ्यासाला बसत होतो. आता माझ्या लक्षात येते, ‘त्या खोलीत आजी पूजा-अर्चा करत असल्याने तेथील वातावरण सात्त्विक झाले होते. त्यामुळे आमचा अभ्यास चांगला व्हायचा.’

आ. आम्हाला पूर्वजांचे त्रास होते; म्हणून आजी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करायची. त्यामुळे आम्हा भावंडांचे शिक्षण आणि लग्न वेळच्या वेळी झाले. घरात अनेक त्रास असूनही सगळे आनंदी होते.

इ. आजी अनेक संतांना घरी बोलवायची. एकदा आमच्या घरी प.प. श्रीधरस्वामी आले होते. ‘संतांनी आशीर्वाद दिल्यामुळे आम्ही तिघी बहिणी साधनेत आलो असणार’, असे आता मला वाटते.

२. आई – कै. सुनंदा देसाई

माझी आई पुष्कळ उत्साही, आनंदी आणि कष्टाळू होती. ती प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारत असे. आर्थिक अडचणीमुळे तिने वयाच्या ४२ व्या वर्षी २ वर्षांचा ‘टीचर्स ट्रेनिंग कोर्स’ केला आणि ती विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिने दादर (मुंबई) येथील राजा शिवाजी विद्यालय येथे शिक्षिका म्हणून १० वर्षे नोकरी केली.

वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरुदेव मुंबईत आले होते. तेव्हा आईला त्यांना भेटायची संधी मिळाली. त्या वेळी तिने स्वतः चकली आणि चिवडा करून आणला होता. तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘आज दिवाळी वाटते. यांना पुढचा जन्म चांगला मिळणार.’’

३. वडील – कै. रमाकांत देसाई

माझे वडील हे पुष्कळ साधे, सरळ आणि प्रेमळ होते. त्यांनी वर्ष १९५५ मध्ये दादर (मुंबई) येथे ‘दुलाबाप्रसाद’ ही इमारत बांधली. वर्ष १९९० मध्ये बाबांचे कर्करोगामुळे निधन झाले. स्वतःच्या मृत्यूची वेळ त्यांच्या लक्षात आली होती. ते रात्री मला म्हणाले, ‘‘यमदेव आला आहे. त्याला सांग, ‘रात्री नको. सकाळी जाऊया.’’ त्यांनी सकाळी माझ्या बहिणीकडून (कै. (सौ.) सुरेखा केणी यांच्याकडून) भगवद्गीतेतील श्लोक म्हणून घेतला, ‘तोंडात मध घाल’, असे सांगितले आणि शांतपणे प्राण सोडला.

आजी, आई आणि बाबा यांच्या साधनेमुळे परात्पर गुरुदेव माझ्या जीवनात आले, मी साधनेकडे वळले अन् माझ्या जीवनाचे सार्थक झाले.

४. मोठी बहीण – श्रीमती शशीकला पै

ही पुष्कळ धाडसी, कष्टाळू, दूरदृष्टी असणारी आणि काटकसरी आहे. तिची परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे. तिने ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून ‘टेक्सटाईल्स् डिझायनिंग कोर्स’ केला आणि साडीची ‘डिझाइन्स’ काढून ती विकण्याचा व्यवसाय चालू केला. तिच्या कष्टामुळे तिला पुष्कळ पैसा आणि यश मिळाले. ितने दूरदृष्टीने देवद (पनवेल) येथे जागा घेतल्या. पुढे जेव्हा आश्रमासाठी परात्पर गुरुदेव जागा शोधत होते, तेव्हा त्यांनी माझ्या बहिणीची जागा आश्रमासाठी निवडली आणि ‘तिच्या जीवनाचा उद्धार झाला’, असे मला जाणवले.

५. मधली बहीण – कै. (सौ.) सुरेखा केणी

कै. (सौ.) सुरेखा केणी

ही अगदी साधी, प्रेमळ, सतत सगळ्यांना साहाय्य करणारी, पुष्कळ सात्त्विक आणि आनंदी होती. तिला साधना कळल्यावर तिने आम्हा सगळ्यांना साधना सांगितली. तिच्या जुळ्या मुली देविका आणि राधिका याही नामजप करतात. तिचे पती डॉ. राजेंद्र केणी यांनी सुरेखाची साधना आणि सेवा यांना कधीच विरोध केला नाही. ते तिला साहाय्य करायचे. साधक घरी आलेले त्यांना आवडायचे. सुरेखाला कर्करोग झाला होता. तिच्या यजमानांनी शेवटपर्यंत तिची सुश्रूषा केली. वर्ष २००९ मध्ये कर्करोगामुळे तिचे निधन झाले; पण मृत्यूनंतरही परात्पर गुरुदेवांनी तिची साधना करून घेतली. मृत्यूसमयी तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती.’

– श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (२७.६.२०२२) (समाप्त)