समुद्रमंथन, कुंडलिनीजागृती आणि स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया यांच्यातील साम्य !

एकदा मी चिंतन करत असतांना अकस्मात् माझ्या मनात विचार आला, ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, म्हणजे एकप्रकारे समुद्रमंथनच आहे.’ त्यानंतर माझ्या मनात पुढील विचार आले.

१. समुद्रमंथन

श्री. योगेश जलतारे

आपण समुद्रमंथनाविषयी पुराणांमध्ये पुढील कथा वाचली असेल – भगवंताने सत्ययुगामध्ये समुद्रमंथन घडवून आणले. त्यासाठी भगवंताने स्वतः कूर्मावतार घेऊन मंदार पर्वताला स्वतःच्या पाठीवर धारण केले. वासुकी नावाच्या नागराजाने मंदार पर्वताला वेढा दिला. मंथनाच्या वेळी वासुकी नागाच्या तोंडाकडील भाग असुरांनी धरला आणि शेपटीकडील भाग देवांनी धरला. या समुद्रमंथनातून अनेक प्रकारची रत्ने, कामधेनु, हलाहल विष आणि सगळ्यांत शेवटी अमृतकलश बाहेर पडला. धन्वन्तरिदेवताही या समुद्रमंथनातूनच अवतरित झाली. शिवाने या समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल विष प्राशन करून सर्वांना वाचवले.

२. साधकाच्या शरिरातील कुंडलिनीशक्तीचा प्रवास 

ही एक प्रकारची आध्यात्मिक प्रक्रिया आहे. जेव्हा साधक साधना करू लागतो, तेव्हा त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन मूलाधारचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत प्रवास करू लागते. धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, कुंडलिनी ही सर्पाच्या आकाराची आहे. ती आपल्या मेरुदंडाभोवती (पाठीच्या कण्याभोवती) वेटोळा घालून बसलेली आहे. तिचे एक टोक साधकाच्या माकडहाडाच्या जवळ असते, तर दुसरे टोक सहस्रारचक्राकडे असते. जेव्हा साधक साधना करू लागतो, तेव्हा तो आध्यात्मिकदृष्ट्या वाटचाल करू लागल्याने त्याच्या कुंडलिनीचा प्रवास साधकाच्या षट्चक्रांतून खालून वर, म्हणजे सहस्रारचक्राकडे होऊ लागतो. कुंडलिनीच्या प्रवासातील खालच्या भागातील मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही तीन चक्रे भौतिक सुखाशी संबंधित आहेत, तर वरच्या भागातील अनाहत, विशुद्ध अन् आज्ञा ही चक्रे आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित आहेत.

कुंडलिनीशक्तीचा प्रवास हेसुद्धा एक प्रकारचे मंथनच आहे. या प्रवासात खालच्या चक्रांची जागृती, म्हणजे एक प्रकारे साधकाच्या मायेतील विचारांना जागृती देणारीच असते. यातून निर्माण होणारे मायारूपी विष साधकाला साधनेपासून, पर्यायाने देवापासून लांब नेणारे असते, म्हणजे ‘मंथनामध्ये कुंडलिनीचे हे टोक असुरांच्या हातात असते’, असे म्हणू शकतो. याउलट अनाहतचक्र ते सहस्रारचक्र, ही वाटचाल साधकाला उच्च आध्यात्मिक अनुभूती प्रदान करणारी, म्हणजे देवत्वाकडे नेणारी असते. याचा अर्थ कुंडलिनीचे हे टोक देवांच्या हातात असते. कुंडलिनीच्या देवत्वाच्या दिशेने होत असलेल्या प्रवासात जसजसे एकेक चक्र जागृत होत जाते, तसतसा साधक एकेका सिद्धीचा अधिकारी होतो, म्हणजे एक प्रकारे त्याला विविध रत्नांची प्राप्ती होते. सर्वांत शेवटी त्याला अमृताची प्राप्ती होते, म्हणजे तो आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण उन्नत होऊन जीवन-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.

३. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया

ही प्रक्रियासुद्धा मनरूपी समुद्राचे एक प्रकारचे मंथनच आहे. या मंथनातून साधक भवसागराचा प्रवास पूर्ण करून मुक्त होणार असतो. प्रक्रियेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना भगवान श्रीकृष्णाचा नामजप चालू करायला सांगितले होते, म्हणजे सत्ययुगात ज्याप्रमाणे भगवंताने कूर्मावतार धारण करून मंदार पर्वताचा भार स्वतःवर घेतला होता, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने या प्रक्रियेचा भार स्वतःच्या पाठीवर धरला आहे. या प्रक्रियेमध्ये साधकाच्या मनाच्या मंथनातून साधकाचे अनेक गुण-दोष बाहेर पडतात. यामुळे साधकांना कधी चांगल्या अनुभूती येतात, तर कधी अहंकाररूपी विषही विविध प्रसंगांच्या माध्यमांतून बाहेर पडते. त्यामुळे साधकाच्या मनाचा संघर्ष होतो. यातून मुक्त होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना शिवाचे एक नाम असलेला ‘निर्विचार’ हा नामजप करण्यास सांगितले. या जपामुळे साधकांना कटू अनुभवांचा विसर पडून निर्विचार स्थितीमध्ये रहाण्यास साहाय्य होते.

यातून एक लक्षात येते, म्हणजे ज्याप्रकारे शिवाने समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष प्राशन करून सर्व जगाचे रक्षण केले, तसे आताच्या काळात स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेच्या कालावधीत अहंकारामुळे जिवाला होणारे दुःख पचवण्याचे सामर्थ्य ‘निर्विचार’ या नामजपात आहे. ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून विविध रत्ने बाहेर पडली, त्याप्रमाणे स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया चालू असतांना साधकांचे विविध गुण उजळून निघतात. साधक या गुणरूपी रत्नांचा धनी होतो.

ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून धन्वन्तरिदेवतेची उत्पत्ती झाली, त्याप्रमाणे स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यानंतर साधकांचे अनेक मनोकायिक आजार दूर होऊन त्यांना चांगले आरोग्यही लाभते. मनाचे मंथन केल्यावर ही एक प्रकारे झालेली भगवंताची कृपाच होय. समुद्रमंथनातून कामधेनु बाहेर पडली. कामधेनु म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी धेनु. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधकांच्या वाढलेल्या भक्तीभावामुळे त्यांची साधना चांगली होऊन देव त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागतो. हे एक प्रकारे साधकांना प्रक्रियेतून कामधेनु मिळाल्यासारखेच आहे. सरतेशेवटी समुद्रमंथनातून अमृताचा कलश बाहेर पडला. देवांनी ते अमृत प्राशन केले आणि देव अमर झाले. त्याप्रमाणे प्रक्रिया यशस्वीपणे राबवल्यानंतर साधकही जीवन-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात, म्हणजे एक प्रकारे ते अमृताचे अधिकारी होतात.’

– श्री. योगेश जलतारे (समूह संपादक, नियतकालिक ‘सनातन प्रभात’), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२३)