कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’चे कलम १६३ लागू केले आहे. यानुसार १७ जुलैपासून कोणत्याही व्यक्तीस सामाजिक माध्यमांद्वारे अफवा, जातीय संदेश पाठवणे, खोटी माहिती प्रसारित करणारे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावणे यांस मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती न्याय संहिता २०२३ कलम २२३ मधील प्रावधान आणि प्रचलित कायद्यान्वये फौजदारी कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात नमूद केले आहे.