कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळिमले यांची माहिती
बिदर (कर्नाटक) – राज्यातील मदरशांमध्ये आठवड्यातून २ दिवस कन्नड शिकवण्यात येणार आहे, अशी माहिती कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळिमले (Purushottama Bilimale) यांनी दिली. प्रारंभी ही योजना बेंगळुरू, विजयपूर, रायचूर आणि कलबुर्गी येथील काही निवडक मदरशांमध्ये चालू केली जाईल. भाषेतील दरी भरून काढणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. अल्पसंख्याक मुसलमानांकडूनही याविषयी मागणी होत असून मदरसे चालवणार्या काही विद्वानांशी याविषयी चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांसाठी शिक्षणात ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. हेच धोरण कर्नाटकातही राबवावे. खासगी क्षेत्रातील नोकर्यांपैकी ८० टक्के कन्नडिगांसाठी राखीव ठेवाव्यात. यासंदर्भात सरकारला पत्र लिहिणार असल्याचे पुरुषोत्तम बिळिमले सांगितले.
या वेळी प्राधिकरणाचे सचिव संतोष हनगल, प्रशासकीय अधिकारी शिवकुमार शिलवंत, कन्नड व सांस्कृतिक विभागाचे साहायक संचालक सिद्राम शिंदे, जिल्हा कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश चनशेट्टी आदी उपस्थित होते.