Halal Tea : आय.आर्.सी.टी.सी.चे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडे बोट !

  • रेल्वेत मिळणार्‍या चहाच्या पाकिटावर ‘हलाल प्रमाणापत्रा’चा उल्लेख !

  • चहा शाकाहारी असल्याचा केला दावा !

(आय.आर्.सी.टी.सी. म्हणजे भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ)

नवी देहली – सामाजिक माध्यमांत एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वेमध्ये चहाच्या पाकिटावर हलाल प्रमाणपत्राच्या उल्लेखावर आक्षेप घेतांना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचेही सांगण्यात येत आहे. याविषयी आय.आर्.सी.टी.सी.ने उत्तर दिले आहे की, हा एक दिशाभूल करणारा व्हिडिओ आहे. कृपया यावर विश्‍वास ठेवू नका आणि तो पुढे पाठवू नका. आय.आर्.सी.टी.सी. त्याच्या खाद्यपदार्थांसाठी केवळ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’चे अनुसरण करत आहे.

या व्हिडिओमध्ये ‘श्रावण महिन्यात (उत्तर भारतात सध्या श्रावण महिना चालू आहे) हलाल प्रमाणित पदार्थ खाण्यास देणे, म्हणजे आमच्या (हिंदूंच्या) धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे’, असे प्रवासी सांगतांना दिसत आहे. त्याच वेळी रेल्वे कर्मचारी प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न करतात की, ‘चहा मांसाहारी नसून शाकाहारी आहे !’

संपादकीय भूमिका 

  • रेल्वेमध्ये विक्रीसाठी असणारे खाद्यपदार्थ जरी ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडून (एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून) प्रमाणित असले, तरी रेल्वेनेही ‘हलाल प्रमाणपत्रा’चा उल्लेख असलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी का ठेवले ?
  • उत्तरप्रदेश सरकारने काही मासांपूर्वीच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या स्वयंघोषित संस्थांवर कारवाई करून त्यांच्या प्रमुखांना अटक केली होती. त्यामुळे रेल्वेनेही याकडे गांभीर्याने पहात अशा पदार्थांची विक्री करू नये, तसेच ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.ने’ही असे प्रमाणपत्र घेतलेल्यांना मान्यता देऊ नये !
  • ‘जर चहा शाकाहारीच आहे, तर मग त्याला हलाल प्रमाणपत्राची आवश्यकताच काय ?’, याचे उत्तर रेल्वेने दिले पाहिजे !